गोविंदकृत पदें २९१ ते २९३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २९१ वें.
तो हा देखिला किं काय । राजा दाशरथी बाई ! ॥ध्रुवपद॥
माथां जटेचा मुकुट । अंगी विभूतिचें कुट ।
हातीं कटारीची मूठ । दीठ लागलि ग आई ॥तो हा०॥१॥
हातीं शोभे धनुष्यबाण । आंगी मेघाऐसा वान ।
तनु गोजिरिसी सान । ध्यान लावी शिवपायीं ॥तो हा०॥२॥
मुख साजिरें सुहास्य । कटी अजिनाची कास ।
भोवता ऋषींचा समस । मोठा बाका शिपाई ॥तो हा०॥३॥
राम चित्ताचा उदार । केला अहिव्येचा उद्धार ।
गोविंदाचा जो सरदार । ब्रिद गाजतसे पायी ॥तो हा०॥४॥
पद २९२ वें.
काय सांगूं सौंदर्य मानवीचें । लोक झाले तटस्थ त्रिभुवनींचे ! ॥ध्रुवपद॥
नील अलकांबरि मोतियांचि मोतियांचि जाळी । कटी वेष्टियली चंद्रकळा काळी ।
हेम तगटाचा घोळ तळी घोळी । मनीं कपटी बाहेर दिसे भोळी ॥१॥
रत्नजडिताचा चुडा उभय हातीं । दशांगूळी मुद्रिका वोप देती ।
पथीं चाले उन्मत्त ज्या साहाती । शब्द वदतां चमकती रत्नदंती ॥२॥
घोळपायींसि ज्या नमनी वाजे । गुजरिया त्यावरी बहु विराजे ।
माज पाहूनी भृंग मनीं लाजे । कटीसूत्र खव्याचें कटी साजे ॥३॥
मुक्त पांच सरी पदकिं रत्नखाणी । गीत गातां तल्लीन यक्षश्रेणी ॥४॥
असो आतां सौंदर्य भाग्यशाली । ंदहास्य लक्ष्मणासमीप आली ।
रामदासातें विपारी झाली । गोविंद प्रभु अनुजास शरण आली ॥५॥
पद २९३ वें.
केवढें भाग्य असे पार्थाचें । वणेवेना वाचे ! ॥ध्रुवपद॥
इंद्रादिक नमिती सुरपद ज्याचें । जें ध्यान शिवाचें ।
सनकादिक स्तविती मंजुळवाचे । नृप मुक्तिपुरीचे ।
उठाव ॥ तो हरिहर करिं धरुनि रहंवरिं योजित बारा दोर हयाचे ॥केव०॥१॥
ज्याच्या नीलांगी पांसु उधळी । बहु शोभा आली ।
आंगीं चंदन उटि कस्तुरि भाळी । तांबुल मुखकमळीं ।
उठाव ॥ कमलनयन अहिअयन जनार्दन स्यंदन हय चालवितो ज्याचे ॥केव०॥२॥
मुकुटी बहु रत्नें झळझ्ळ करिती । श्रुतिकुंडल स्फुरती ।
सोभे चतुरायुध ते चहुं हातीं । सुरवर नर स्तविती ।
गुर्नरशार्दुलवरप्रसादें गोविंद हरिगुण गाउनि नाचे ॥केव०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP