मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
रामकविकृत पदें ७७ ते ७९

रामकविकृत पदें ७७ ते ७९

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ७७ वें.

पंढरपुर वैकुंठभुवन । विठ्ठल नांदे महाराज रुक्मिणीरमण ॥ध्रुवपद.॥
श्यामसुंदर हस्त कटावर । कमललोचन गळां पदकहार ॥पंढर०॥१॥
मस्तकीं मुगुट कासे पीतांबर । हास्यवदन उभा विटेवर ॥पंढर०॥२॥
भाळीं टिळक, गळां तुळसीहार । आंगी उठि चंदन केशर ॥पंढर०॥३॥
शंख चक्र गदा पद्म आयुध । कौस्तुभ वैजयंती  माळ सुगंध ॥पंढर०॥४॥
सर्व  तीर्थांचें तीर्थ चंद्रभागा । स्नान करितां पातक जाई भंगा ॥पंढर०॥५॥
ऐसें पांडुरंगाचें पूर्ण ध्यान । दर्शन होतां नासे जन्ममरण ॥पंढर०॥६॥
भगवज्जन प्रेमभावें भजती । त्यांसी मोक्ष त्वरित होय प्राप्ति ॥पंढर०॥७॥
राम म्हणे शरण देवा ! तुज । तुझी स्मृति सतत देई मज ॥पंढर०॥८॥

पद ७८ वें.

कृष्णा ! धननीळा ! लौकर येईं ।
देवा ! श्रमलों मला मुक्ति देईं देईं ॥ध्रुवपद.॥
संसाराचें दु:ख झालें भारी । कन्यापुत्रांवरी लोभ बहुपरि ।
येणें चित्ता व्यामोह मुरारि ! आतां दिनातें सोडवीं हरि हरि ॥कृष्ण०॥१॥
कामसर्पें मज ग्रासियलें । तेणें मन भ्रांतिमध्यें पडियलें ।
म्हणुनि निजसुख अंतरलें । हरि ! सोडवीं आयुष्य गेलें गेलें ॥कृष्ण०॥२॥
नारायणा ! देवा ! कृपा करीं । जन्ममर्णमोह निवारीं ।
मला मायानदितें उतारीं । ऐसें विनवितों कुंजबिहारी  हो हरि ! ॥कृष्ण०॥३॥
ह्रदयी गोपाळ प्रगढला ।  तेणें ब्रम्हानंद थोर जाला ।
अहंममता विसर पडियेला । राम म्हणे द्रगद्दश्यभाव गेला गेला ॥कृष्ण०॥४॥

पद ७९ वें.

हरि ! मज दीनातें उद्धरीं ॥ध्रुवपद.॥
त्रिविध ताप वैरी जाळिताती । बहु याचें दु:ख होतसे भारी ॥हरी०॥१॥
बासनेच्या छंदें काम्यकर्मे केलीं । इहस्वर्गफळभोगकारी ॥हरी०॥२॥
आतां देवा ! भ्रमांत बुडालों । कृपा करी, भवाब्धितें तारीं ॥हरी०॥३॥
राम म्हणे कृष्णा ! करुणा परिसावी । तव स्मृति देईं अंतरीं ॥हरी०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP