रामकविकृत पदें १२३ ते १२५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १२३ वें.
उत्तम तुझें नाम कृष्णा ! वाटतें मज प्रिय ।
द्वैत विचारितां मना लागे अप्रिय ॥ध्रुवपद.॥
स्वधर्म कर्म अर्पण केलें असे जयालागीं ।
मुमुक्षु शिणले येच अर्थी बहु जगीं ॥उत्तम०॥१॥
भुक्तिमुक्ति तुझ्या चरणी आहे ती प्रत्यक्ष ।
श्रुतिशास्त्रें ऐसी देतातहि साक्ष ॥उत्तम०॥२॥
शरीरर वाचा चित्त तुझे पायीं हें अर्पण ।
सप्रेम भक्तिभावें राम जालासे लीन ॥उत्तम०॥३॥
पद १२४ वें.
आजुन कां रे ! भ्रमें भुललासी । आयुष्य गेलें काळ तुला ग्रासी ॥ध्रुवपद.॥
बाळपण गेलें तारुण्य उभारलें । योषितेच्या । योषितेच्या संगें अन थिजलें ।
आप्तवर्गी स्नेह विस्तारिलें । येणें तुझें वय व्यर्थ गेलें ॥आजु०॥१॥
लोभसर्पें तुला डंखियलें । वासनेनें बहु भुलविलें ।
संसारचक्रीं चित्त लुब्ध जालें । तेणेम हरिचें स्मरण अंतरलें ॥आजु०॥२॥
आतां तूंचि करीं द्वैतत्याग । आत्मबोधें होईं अंतरंग ।
विवेकज्ञानें होसी तूं नि:संग । तेणें तुझा जाईल भवरोग ॥आजु०॥३॥
राम म्हणे सार्थक हेंचि जालें । जीव देवा ! शरण ऐसें आले ।
त्यांचे जन्ममरण वाव जालें ! प्रेमभावें आनंदें पूर्ण धालें ॥आजु०॥४॥
पद १२५ वें.
काय सांगूं गुरुपदींची बाई ! माता ॥ध्रुवपद.॥
बोधेंकरुनि मन हरपलें । वृत्ति लीन जाली अकस्मात ॥काय०॥१॥
द्वैताद्वैत निरसुन गेलें । हरी प्रकाशला हृदयांत ॥काय०॥२॥
ध्येय ध्याता ध्यान सर्वही गेलें । चैतन्यचि चित्त आनंदांत ॥काय०॥३॥
सगुण निर्गुण अवघा देव । मग सहजचि अभिमान ॥काय०॥४॥
अच्युतसुत राम अनन्य । कृष्णचरणीं निवांत ॥काय०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP