गोविंदकृत पदें १८७ ते १९०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १८७
आजुनी आली तों का येईना शौरी । झाली हे तों रात्र भारी ॥ ध्रुवपद.॥
मनिं वाटे श्रीरमण, अन्यकामिनींना मोहुन, मदनासि वश होउन, चंचळ यदुराज बुझ विसरुनियां मजला, हर हर हरि तिशीं अनुसरला, लाज माझी हरुनी हे करणी अनुचित तूं सत्य संघांत धुरंधर मंदरधरणा ऐसें वद जा तक तक त थै थै यादिगिदिसिधीं ताना ताना दिरिना भुलवुनी मला मंजुतर वचनीं लाज माझी हरुनी हे करणी अनुचित तूं सत्य संघांत धुरंधर मंदर धरणा ऐसें वद जा जलदनील गोविंदविभुगुणमंदिर करुणाजलधि कुंदरदनि तों तदनि तों तदर दानि तों दिरि दिरि ना दिरि तिलान दिरि ॥
आजुनि आली० ॥१॥
पद १८८ वें.
हरि ! तूं कृपा करीं झडकरी ॥ध्रुवपद.॥
तुझी कृपा होतां गोविंदा ! । मुका निगम उच्चारी ॥ हरि !० ॥१॥
अंधाप्रति जग सर्वहि दीसे । पंगू लंघी गिरी ॥ हरि !० ॥२॥
गोविंद म्हणे चित्तिं निरंतर । षड्रिपु दूर करी ॥हरि !० ॥३॥
पद १८९ वें.
कोदंडशर पहातां हातीं, नयन भुकेले ॥ ध्रुवपद. ॥
दशशतरवि प्रभु मुकुटीं ज्याच्या । तेज व्यापिलें त्रिजगतीं ॥ पहातां० ॥१॥
गोविंददास म्हणे मज आतां । पूर्णानंदी विश्रांति ॥ पहातां० ॥२॥
पद १९० वें.
येई रे ! कीर्तनिं नाचत गणराया ! । जी गौरीतनया ! ॥ध्रुवपद.॥
देई मति स्फूर्ति तव गुण गाया । तद्विघ्न हराया ॥
पाया नमितों ये धांवुनि सदया ! । दुष्कृत ने विलया ॥
चाल ॥
मायामोहित मन माझें ।
झालें, चुकवीं भवओझें ॥
टीप ॥
व्याजें प्रार्थित भवसिंधु तराया । जी गौरीतनया ! ॥ येई० ॥१॥
अरुणापरि माथां सिंदुर विलसे । क्षीरांबर कासे ॥
पाशांकुश फरश करीं धरिलेसें । रवि मुकुटिं प्रकाशे ॥
चाल ॥
ऐसी तूं मंगलमूर्ति ।
वरदायक स्वामि अनूर्ति ॥
टीप ॥
सच्चित्सुखदा...........। जी गौरीतनया ! ॥ येईं० ॥२॥
दात्या गुरुनाथ नृसिंहप्रसादें । लीला स्वच्छंदें ॥
तोषे मन कर्णासहित प्रमोदें । हृत्कमलीं दोंदें ॥
चाल ॥
उठती स्वानंदविलासा ।
प्रगटे ब्रह्मांडप्रकाशा ॥
टीप ॥
दासा गोविंदा क्षम दे सखया ! । जी गौरीतनया ! ॥ येई० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP