नामदेवकृत पदें ५० ते ५३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ५० वें.
ते मुंगीं उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्रिवेणी गंगा ॥ध्रुवपद.॥
उदकाचे ढवळे मशीची वाती । तेथें अंधारीं मुंगीने लाविली ज्योती ॥ते०॥१॥
अवघे आकाश मुंगीये मागें । मुंगीनें संसार सांडिला मागें ॥ते०॥२॥
विष्णुदास नामा मुंगीये मागे । मुंगी उमगली खेचरसंगें ॥ते०॥३॥
पद ५१ वें.
पांच पोळ्या सात भाकरी । दीड कानूला अधीं पुरी ।
माझी हिरुनी सिदोरी । कानोवा निवडी आपुली गोधनें ।
काडी हुडकून गोधने ॥धुवपद.॥
कानोवा बोढाळ तुझ्या गाई । उभ्या न राहती कदंबा छाई ।
उडया घेती यमुनाडोहीं । आम्हांला रागें भरेल तुझी आई ॥का०॥१॥
परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा ।
सांगूं गेलों तुझिया घरा । तुझा पाठी लागला म्हातारा ॥का०॥२॥
परीयेसीम ह्रुषीकेशी । गाई दुभत्या दुध पिसी ।
वत्सें प्यालीं म्हणुनी सांगसी । उद्यां तक्र नाहींच आम्हासी ॥का०॥३॥
नामा म्हणे शेषशायी । तूंची बाप तूंची आई ।
आम्ही वत्सें तूं गाई । येउनी अखंड ह्रदयीं राहीं ।का०॥४॥
पद ५२ वें.
कुतना ! थमाल ले ! थमाल अपुल्या गाई ॥ध्रुवपद.॥
कुतना ! थमाल ले ! थमाल अपुल्या गाई ।
आम्हि दातों ले ! आपल्या घलास दातों भाई ! ।
येथें यायाता आमचा इलाज नाहीं ।
तुजी थंगत ले ! थंगत कलली भाई १॥कुतना०॥१॥
मला म्हनता ले ! जाईं गाई लाख ।
तुम्हामधी ले ! मी आहें गलीब एक ।
किती मी धांवूं ले ! कांता लागला पायीं. ॥कुतना०॥२॥
कालि पिवली ले ! गाय आहे तानेली ।
या या गवल्याची धबली गाय पलाली ।
मदला बघून ले ! गवली तो माला माली ।
काती कामली हिसकून घेतली साली. ॥कुतना०॥३॥
काल बलाचि ले ! बलाचि खलवस केला ।
तुम्ही अवघ्यांनीं फाल फाल घेतला ।
मी निपजत ले ! म्हनुनी थोलका दिला ।
तूं म्हणसिल ले ! याला कलत नाहीं कांही ॥कुतना०॥४॥
यमुनातीलिं ले ! नित कलिती आंघोली ।
म्हणतां मजला ले ! आणी सिदोली ।
कईंची आनुं ले ! वरन आनि भाकली ।
माजा ले ! काम आइकतो भाई !॥कुतना०॥५॥
कृष्ण म्हणे, रे ! उगा राहिं बोबडया ! ।
तुझ्या गाइ रे ! मीच वळवितों गडया ! ।
नाहींतर धाडिन रे ! गोपाळांच्या जोडया ।
नामा म्हणे, ‘रे ! गोष्ट रोकडी पाही.’ ॥कुतना०॥६॥
पद ५३ वें.
करितों जोहार करितों जोहार । मी संतघराचा महार. ॥ध्रुवपद.॥
विवेकनाइक आमचें नांव । गिर्गुणपुर हें माझें गांव ।
बसवि पंचभूतांचा ठाव । रस्ते चार रस्ते चार ॥मी संत०॥१॥
आत्मधनी हा पाटिल बाबा । मनाजी प्यादा चालवी गावा ।
बुधोजीशेटी बळकट वरवा । घरांत बैसलीसे आवा ।
खेळवि पोर खेळवी पोर ॥ मी संत० ॥२॥
कौल शत वर्षांचें मूल । तीनशें साठ बहात्तर कूळ ।
कामाजी देशमुख सबळ । क्रोधाजी देशपांडया खळ ।
नेणे सरकार नेणे सरकार ॥मी संत०॥३॥
शेवती नारी तुमची धड । पडेल चौर्यांशींचा कोड ।
अंतीं जीवाजीशी सांकड । सांगतो खरें सांगतो खरें ॥मी संत०॥४॥
हिशेब पडेल जव सरकारी । येईल यमाजीची स्वारी ।
धरोनि जिवाजी कारभारी । देतील मार देतील मार ॥मी संत०॥५॥
आवडी राखा मजवरी हेत । मी तंव करीन तुमचें हेत ।
संतसंगी लावीन चित्त । नामया सार नामया सार ॥मी संत०॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP