गोविंदकृत पदें २०१ ते २०५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २०१ वें.
माझी गुरु माउली ग ! नरहरी ! ॥ ध्रुवपद.॥
भक्तिज्ञान विरक्ति अंगी। सद्भावें पावली ग ! ॥ माझी० ॥१॥
जे चैतन्यसुखाची मूर्ति । हृदयांतरिं राउळीं ग! ॥ माझी० ॥२॥
गोविंद वत्सल तुज दीन तान्हें। ये सत्वर गाउली ! ॥ माझी० ॥३॥
पद २०२ वें.
गुरु नरहरि वळला । तेव्हां विश्र्वंभर फळला ॥ ध्रुवपद.॥
नामरूपातित वस्तु सदोदित । शाश्र्वत जिविं धरिला ॥ गुरु० ॥१॥
तो साम्राज्यसुखाचा दाता । निश्र्चय मज कळला ॥ गुरु० ॥२॥
जो तंतू या विश्र्वपटाचा । गोविंदीं मिळला ॥ गुरु० ॥३॥
पद २०३ वें.
श्री गुरुनाथ परात्पर योगिया फणिपुरवासी ।
चिद्धनदिव्यप्रकाशक आत्मा श्रीविष्णु काशी ॥ ध्रुवपद.॥
ताराया जगतीला आला हाची सुखदानी ।
जो स्वानंदविलासी लीला काय वदूं वदनीं ।
निरुपम उपमा न दिसे कांहीं पाहतां या नयनीं ।
तो करुणाघन वळतां मिळवी लवण जसा जिवनीं ॥ श्रीगुरु० ॥१॥
संसारस्थिति दावी परि तो त्रिभुवन गोसाई ।
उघड समाधी ज्याची पाहे गणपति सर्वां ठायी ।
काय वदूं नवलाव तयाचा मति कुंठित पाहीं ।
वरदायक सद्गुरु नरहरिचा मी त्याच्या पायीं । श्रीगुरु० ॥२॥
तो गुरुनाथ नरोत्तम उत्तम अक्षय पददाता ।
सहज कृपेनें पाहतां देतो अलक्षपद हाता ।
देहस्थिति मजकरितां धरिली काय वदूं आतां ।
बाह्यांतर व्यापक जो गोविंदाचा भयत्राता ॥ श्रीगुरु० ॥३॥
पद २०४ वें.
जगदाकार स्वरूपा अरुपा श्रीसद्गुरुराया ।
तूं विश्र्वाद्यप्रकाशक स्थिरचर भरोनि उरलासी ।
विश्र्वस्थिति उद्भवसी अंतीं स्वरुपीं मेळविसी ॥ जग० ॥१॥
रजतमसत्वगुणत्रय देवा ! तुवांचि निर्मियले ।
घट प्रारब्धें जैसें तैसें तुवांचि वागविलें ॥जग० ॥२॥
हा संपूर्ण विलास तुझा गोविंद द्वैत हरी ।
अभयवरदकर माथां ठेवुनि दीनातें तारीं ॥ जग० ॥३॥
पद २०५ वें.
श्रीगुरु देवराया शरण मी तुज आलों ।
पाहतां चरण तुझें अंतरीं फरचि घालों ॥ ध्रुवपद. ॥
संसारजन्य दुःखा भोगितां बहू श्रमलों ।
होईल गती कैसी मी मायेमध्यें बुडलों ॥ श्री० ॥१॥
संसारी मग्न झाली मम वृत्ती गुरुराया ! ।
ना दिसे सौख्य कांहीं हे व्यर्थ गेली काया ।
सूचेना यत्न मातें अनिवार तुझी माया ।
सुकृत नाहीं पदरीं व्यर्थ कां वांचुनियां ॥ श्री० ॥२॥
देशिका ! तार आतां पतितास मायबापा ! ।
हा जन्म वृथा गेला मजवरी करी कृपा ।
परलोकसाधनाचा तूं दावीं मार्ग सोपा ।
गोविंददास तारी निवारी जन्मखेपा ॥ श्री० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP