श्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १५९ वें.
कर्णधारें मज करणी केली कांहीं न बोलवे बोल ।
मन हें माझें भांबावलें. ! ॥ध्रुवपद.॥
उगीच आसनीं बसलें होतें एकांतीं मी स्थीर ।
मंजुळ वाहात होता समीर ॥
वोढावोढी करोनि त्यानें ठेवुनि डोय़ीं कर ।
लाविलें मंदिराचें द्वार ॥
टीप ॥ बोल कुणाचे ऐकुं न येती झोंप आली एक पळ. ॥मन०॥१॥
काय सांगुं झोंप मुखाची दिसला गे ! आंधार ।
वाद्य ऐकिलें मग अपार ॥
घांट कठिन वाट चालतां पहांट वाटली जर ।
निघाला तितक्यांतचि भास्कर ॥
टीप ॥ एक भागीं तो सोम शोभतो मध्यें तो अनिल ॥मन०॥२॥
बारासोळा कळा मिळाल्या एक जागिं तेजाळ ।
जाहला अग्रीचा हिलाल ॥
इंदुवदन आणि कुंदरदन तें विशाल भाळ सोज्ज्वळ ।
देखिला ज्योतिमध्यें एक बाळ ॥
टीप ॥ निसंगपणें म्यां संग केला चित्पदीं जडेल. ॥मन०॥३॥
रतिसुखाचें सुख न वदवे काय सांगुं मी जनी ।
अद्बूत श्रीगुरुची करणी ॥
गोष्टी लिहाया न पुरे सिंधू शाई, कागद मेदिनी, ।
देतिल साक्ष संत गुणी ॥
टीप ॥ एकाएकीं रामकृपेनें श्यामसुता लाधेल. ॥मन०॥४॥
पद १६० वें.
ज्याचें मीपण आटेना । त्यासी देवहि भेटेना. ! ॥ध्रुवपद.॥
खेचरी भूचरी लावी अगोचरी । धनरामा विटेना. ॥त्यासी०॥१॥
जप तप साधन सेवित विपिनी । काम्यप्रीती सुठेना. ॥त्यासी०॥२॥
श्यामात्मज म्हणे गुरुबोधाविण । भवभ्रम तुटेना. ॥त्यासी०॥३॥
पद १६१ वें.
दावा मज कोणि नयनीं । दाशरथी आत्माराम. ! ॥ध्रुवपद.॥
वसे तेथें कांहीं न दिसे । दिसेना तेथेंचि असे ।
असे नसे टाकुनि म्हणति भजावें हो ! निष्काम. ॥दावा०॥१॥
अकामिका कामिका म्हणती । कामिका निष्कामिक वदती ।
कामिक निष्कामिक त्यजुनी म्हणति मुख्य एक नाम ॥दावा०॥२॥
नाम तिथें धाम आहे । धामीं आत्माराम पाहे ।
श्यामात्मज म्हणे गुरुच्या सेवेविण दुर्लभ धाम ॥दावा०॥३॥
पद १६२ वें.
या मनगजदा आवरा जी ! ॥ध्रुवपद.॥
नळभूपाळा काय सोहळा । गांजियलें हरिश्चंद्रा जी ! ॥या०॥१॥
सकुळ रावण ठार मारिला । कलंक लाविला चंद्रा जी !॥या०॥२॥
मरे दुर्योधन मित्रसबांधव । भगांकित केलें इंद्रा जी ! ॥या०॥३॥
नारद. नारी, भस्मासुर भस्मचि । नग्न करी भालचंद्रा जी ! ॥या०॥४॥
श्यामसुत वदे जर्जर मुनिवर । काय पाड या नरेंद्रा जी ! ॥या०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP