कृष्णदासकृत पदें २४ ते २६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २४ वें.
मना ! नरहरि गुरुपद भज रे ! द्दढ धरीं रे ! ।
मोह त्यज किती रे ! । ध्न सुत देह गेह ॥
माया रे ! जाया रे ! भमें भुलला रे ! ॥ध्रुवपद.॥
सकल जीव जंतु देवादिक । इच्छिति दुर्लभ ऐशी ।
प्राप्त नोहे पुन्हां रे ! मानवी काया रे ! ॥मन०॥१॥
प्रपंचीं सत्यत्व मानोनि वृथा शीण । धरिसी अनित्य हें ।
स्वप्नापरिही मिथ्याचि । जाइल वांया रे ! ॥मन०॥२॥
देहाभिमान त्यागोनि भक्ति ज्ञान । विरक्ति साधिसी जरी ।
कृष्णदासा असि । त्वरें करिल दया रे ! ॥मन०॥३॥
पद २५ वें.
येउनियाम नरदेहा प्राण्या ! शोध करीं अपुला ।
सद्नुरुच्ररणा शरण जाउनि चुकवीं जन्म झाला. ॥ध्रुवपद॥
कोण मी कैंचा कोठून येणें जाणें हें पाहीं ।
विचार करुनि हृदयमंदिरीं आत्मसुखें तूं राहीं ।
एक एक योनी कोटी फेरे भोगुनियां महीं ।
मानवदेह हा तुला मिळाला पुण्यप्रवाही ॥
चाल ॥ भोगिल्या योनी नव लक्ष जळचरीं ।
दशलक्ष दुर्घट पक्ष्यंभीतरीं ।
कृमी कीटका अकरा विंशती स्थावरीं ।
तीस पशू, चार मानव झाले तरी ॥
टीप ॥ गणतिला चौर्यायशीं लक्ष बेरीज प्रचित पहा तूं वहिला ॥येउ०॥१॥
पाप पुण्य हें समान जेव्हां ब्राम्हाण हा जन्म ।
तुला मिळाला शेवट याचे चुकवी जन्म मरण ।
दुर्धर माया धन सुत जाया बंधु ही बहीण ।
‘माझे माझे’ म्हणसिल, अम्तीं देतिल टाकून ॥
चाल ॥ देह नाशिवंत पाण्याचा बुडबुडा ।
व्यर्थचि का भुललासि रे । मुढा ! ।
आप्तसोयरे पायीं बेडी खोडा ।
करीं विवेक जाईं संतांपुढां ॥
टीप ॥ सद्नुरुपदासी मिठी घालुनि तोडीं पाशाला ॥येउ०॥२॥
पंचभुतात्मक पिंडपसारा दुर करुनी सारा ।
महावाक्याचा विचार करुनी फिर तूं माघारा ।
त्रिगुणात्मक दुस्तर गुंती उगवीं हा दोरा ।
चौदेहांच निरास करुनी घे आत्मपदीं थारा ॥
चाल ॥ ‘त्वंपा’ ‘तत्पद’ निजगुज हें कानीं ।
तूं ‘असिपद’ भाव लीन भोगीं उन्मनीं ।
तुम्ही अनन्य भावें लाग गुरुचरणीं ।
मग सहजचि दैवत जाइल नाशोनी ॥
टीप ॥ कृष्णदास हा सद्नुरुकृपें नाशीं संसतिला ॥येउ०॥३॥
पद २६.
‘दत्तात्रय’ चतुरक्षरी मंत्र जपतां निजवानीं ।
ऋद्धि सिद्धी द्वारीं तिष्ठती अखंड निजसदनीं ॥ध्रुवपदं.॥
दश दिशा व्यापक योगि हा सच्चिदानंद, ।
दश इंद्रियें चालक, चराचरीं असोनी निर्द्वद ।
दंड कमंडलु त्रिशूल माळा करीं कमलमकरंद, ।
दर्सनमात्रें भक्तालागीं देतो निजपद ।
दयाळ पतितपावन नाम गणती अठरा पुराणी. ॥दत्ता०॥१॥
तात अत्रिऋषी, अनसूया माता ।
तारिसी शीघ्र भक्तजनांशि देऊनि अनन्यता ।
तापसवृंद निशिदिनीं ध्याती दत्त अवघूता ।
तात्काळचि भेट देशी जैशी कनवाळू माता ।
तारक रक्षक किति मी वर्णू गर्जे वेदवाणी ॥दत्ता०॥२॥
त्रयमूर्ति हौनी दत्त विचरे स्वतंत्र ।
त्रयलोकीं गमन ज्याचें जाणती सर्वत्र ।
त्रयतापहारक नाम जगीं पवित्र ।
त्रस्त पावुनि शरणागता तारिसी क्षणमात्र ।
तृषित चकोर देखुनि इंदुपीयूष दे वदनीं ॥दत्ता०॥३॥
यदुरायाशीं ब्रम्हाबोध हा केला अद्वय ।
या स्वरूपाचा अगाध महिमा वर्णूं मी काय ? ।
यक मुखें किति मी वर्णूं ? शेष थकित होय ।
यकात्मभावें कृष्णदस हा शरण तव चरणीं ॥दत्ता०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP