गोविंदकृत पदें २६७ ते २७०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २६७ वें.
श्रीरामा कृपासमुद्रा दाशरथे ! मां पाहे । ममांतरिं राहें ! ॥ध्रुवपद.॥
आधिभूतिआध्यात्मिकदैविक । दु:ख शमवि करुं काये ॥ममांतरि०॥१॥
कामादिक षडरिपु अतिदुस्तर । जाचती क्लेश न साहें ! ॥ममांतरि०॥२॥
तूंचि सर्व गण गोत आप्त सखा । तूंचि जनक मज माये ॥ममांतरि०॥३॥
गोविदप्रभु नाथ नरोत्तम । निरयगती तुज, त्राहे ॥ममांतरि०॥४॥
पद २६८ वें.
रामा ! कामारिहृदयनिवासा ! । मुनिमानसहंसा ! ॥ध्रुवपद.॥
नामामृत सेवुनि वाल्मिक तरला । भ्रम त्याचा हरिला ।
श्यामांगा प्रेम तुझाचि धरिला, । शुद्ध भाव वरिला ।
नक्रें छळितां तो दुर्जन करिला । त्यासह उद्धरिला. ॥रामा०॥१॥
शुका पढवितां वेश्या तरली । गणिका उद्धरली ।
शवरी पदपद्मी झाली भ्रमरी । शाश्वतपदिं शिरली. ॥रामा०॥२॥
मातें पतितातें न करीं परता । श्रीजानकीकांता ! ।
मातें तुजवीण नसे बा ! त्राता । चुकवीं भवव्यथा, ॥रामा०॥३॥
नाहीं पुण्याची किंचित जोडी । बाहत्तर खोडी ।
परि मज लागलि तव नामी गोडी । पुरवावी अवडी ॥रामा०॥३॥
नाहीं पुण्य़ाची किंचित जोडी । बाहत्तर खोडी ।
परि मज लागलि तव नामी गोडी । पुरवावी अवडी ॥रामा०॥४॥
पतितोद्धारण व्रिद प्रभुच्या पायीं । निगमादिक ग्वाही ।
तारीं मजला तुं सख्या ! लवलाही । गोविंदा पाही ॥रामा०॥५॥
पद २६९ वें.
भज श्रीराम नरोत्तम माझा, कां चढला ऐश्वर्यमदा ? ।
पूर्ण पुण्य जंव पदरी बापा तंव म्हणती दादा दादा. ! ॥ध्रुवपद.॥
पहिलें कोण दिवस तुज होता तोचि समज आपुलें चित्तीं ।
जगरूपी जगदीशकृपेत्तें फळ चढले तुझिया हातीं ! ॥भज श्री०॥१॥
हें ऐश्वर्य हरीचें देणें, प्राप्त सख्या ! सुकृतजोडी ।
राज्याश्रित जन मानुनि देती बैसाया गाडी घोडी ॥भज श्री०॥२॥
पाह्तां पाहतां कैक दरिद्री झाले हे निवले डोळे ।
हयशाळा घरिं वाजे चौघडा त्याला भाकरही न मिळे ॥भज श्री०॥३॥
दरिद्र अथवा दौलत हें फळ दैवानें बापा मिळती ।
न करावा अपमान दिनाचा ऐका दासाची विनती ॥भज श्री०॥४॥
गोविंद प्रसुनाथ नरोत्तम कैवारी निजदासाचा ।
पतीतपावन ब्रीद रुळे पदी, काय करिल न फळे साचा ॥भज श्री०॥५॥
पद २७० वें.
श्रीराम जय राम जय जय राम ! ॥ध्रुवपद.॥
श्रीमद्राग रविकुळभूषण । भक्तसखा कनवाळू राम ॥श्रीराम०॥१॥
रातोत्पलदलवत कोमल । कौसल्यागर्भोद्भव राम ॥श्रीराम०॥२॥
मखरक्षणार्थ नृपाला प्रार्थुनि । कौशिकमुनि मखरक्षक राम ॥श्रीराम०॥३॥
जनस्थानाचा मार्ग रोधुनि । ताटिका पद घे निष्काम ॥॥श्रीराम०॥४॥
एक शरें विस कोटि निशाचर । मारुनि मुनिला दे आराम ॥श्रीराम०॥५॥
रामा गोतममुनिची शीला । निजपदरज केली विश्राम ॥श्रीराम०॥६॥
महदुत्सह मानूनि अहल्या । पूजनि जपत प्रभुचें नाम ॥श्रीराम०॥७॥
जनकसुता गृहिं घेउनि येतां । पथिं जिंतियेला भार्गवराम ॥श्रीराम०॥८॥
एकपत्निव्रत श्रेष्ठ जयाचें । योगिजनाचा मनविश्राम ॥श्रीराम०॥९॥
जनकाज्ञाप्रतिपालक राघव । दंडकवनवासी श्रीराम ॥श्रीराम०॥१०॥
यमरूपी शोधूनि दशानन । वधुनि तया दे निजसुखधामा ॥श्रीराम०॥११॥
राक्षसपति वैश्रवण विभीषण । स्थापुनि दिधला कांचनग्राम ॥श्रीराम०॥१२॥
मनुजाकृति गोविंदा साचा । दैशिक नरहरि आत्माराम ॥श्रीराम०॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP