गोविंदकृत पदें २५४ ते २५६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २५४ वें.
शरयूतिरवासि दयाळे ! । कनुवाळे ! सत्वर येईं ! ॥ध्रुवपद.॥
अहंकार दशानन मेला खळ नेतो अविद्याविपिनीं ।
श्रीरामा ! सत्वर यावें सोडविता नाहीं कोणी ।
सद्भाव सुमित्रात्मज तो दवडीला कठोर वचनीं ॥
चाल ॥ विपरित कर्माची करणी ।
दुर्मति मज आली घडोनी ।
दुर्गति होईल निदानीं ॥शरयू०॥१॥
श्रीरामा पद्मजजनका पद्माक्षारमणा धांवें ।
पद्मजतनया श्रमहरणा मज पतितालागुनि पावें ।
पडलों दुष्टाच्या हातीं आतां म्यां काय करावें. ?॥
चाल ॥ कवणाप्रति शरण रिघावें ?।
कवणाचे पाय धरावे ? ।
विष खावोनियां मरावें ॥शरयू०॥२॥
गुरुनाथ नरोत्तमराया, ब्रम्हांडनिवासा ! रामा ! ।
आनंदरूपा त्वां यावें योगीजनमनविश्रामा ! ।
गोविंद दीनाप्रति त्राता न दिसे रे ! आत्मारामा ! ॥
चाल ॥ पुरवावें मदंतरकामा ।
यावें रे ! चित्मुखधामा ।
निर्गुणरूप दाखवी आत्मा ॥शरयू०॥३॥
पद २५५ वें.
येईं वा ! रघुराया ! सीताकांता ! । पद दावी समर्था ! ॥ध्रुवपद.॥
रामा ! तुजवांचुनि मी परदेशी । पडलों भवपाशीं ।
माता सांभाळी बाळकासी । तद्वत तूं मजसी ।
न करीं अव्हेर सख्या ! गुणवंता ! ।पद०॥१॥
कैसें जन्मांतर आडवें पडलें । विषयीं मन बुडलें ।
कामादिक शरिरी येउनि भिडले । बहु दुष्कृत घडलें ।
आतां कोणी न दिसे मज त्राता ।पद०॥२॥
येणें जाणें तुजलागुनि नाहीं । तूं सर्वां ठायीं ।
आहे व्यापक हें कळकें कांहीं । जरि का मम देहीं ।
अझुनि लपलासी ? प्रगटें आतां ।पद०॥३॥
पहिलें दीनाला दावुनि आशा । मग कां जी ! निराशा ।
करणें हें योग्य नव्हे जगदीशा । पद्याक्षिविलासा ।
दासा गोविंदा तारिं अनाथा ।पद०॥४॥
पद २५६ वें.
रामा ! घनश्याम राजिवनेत्रा ! । मदनारिमित्रा ! ।
साकेताधिपते ! कोमलगात्रा ! । दारथनृपपुत्रा ! ॥ध्रुवपद.॥
नाहीं सुकृत मज घडलें कांहीं । दुष्कृत या देहीं ।
जडलें, आतां कोण गति करुं कांहीं । बुडलों भवडोहीं ॥रमा०॥१॥
कैशी नववीधा तूझी भक्ति । कसि आहे विरक्ति ।
अंगीं जडली अविद्यात्मक शक्ति । हे माया भ्रांति ॥रमा०॥२॥
ऐशा अधमाला कोण त्राता । हे जानकिकांता ! ।
आतां गोविंदा तारीं समर्था । प्रभु दीनानाथा, ॥रमा०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP