मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें १९९ ते २००

गोविंदकृत पदें १९९ ते २००

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १९९ वें.

जय कमलोद्भवकन्यके ! जगदंबिके, वचन आईकें, जगत्रयजननी ।
तूं कृपे करुनि मम स्‍फुरविं परादिक वाणी. ॥ ध्रुवपद.॥
व्यासादिक कवि भले, पूर्वीं जाहले, तिहीं वंदिले, तुझ्या पदकमला ॥
वाचांशशक्ति वैखरी देसि तूं खरी कविमुखकमला ॥
तूं सुरवरवरदायिनी, हंसवाहिनी, बुद्धिदायिनी, धन्य तव लीला ।
वीणापुस्‍तकधारिणी गासि निजवदनीं श्रीहरिलीला ॥
चाल ॥ वरदायिनी अतिकनुवाळे राजसे ।
निजभक्तजनप्रतिपाळे । राजसे ।
गुणसरिते पद्मजबाळे । राजसे ।

उठाव ॥     
मज दासावरि करिं कृपा, आणि तूं रूपा, दावीं चिद्रूपा, सखे मम जननी ।
तूं कृपा करुनि वरदहस्‍त ठेविं मम मूर्ध्नि ॥ जय० ॥१॥
        
मी बाळ तुझा अज्ञान, जसे मज ज्ञान, करी परि ज्ञानबुद्धि दे माते ।
तुजवीण असें मी दीन तव पदीं लीन सखे गुणवंते ।
इच्छा माझी परिपूर्ण, करावी तूर्ण, देईं वरदान, कृपें अधमातें ।
धरूनि माझा अभिमान रक्षुनि मान न करिं अनमान, तारि भवत्राते।

चाल ॥    
भवसिंधूपासुनि तारीं । राजसे ।
जन्मांतर दृष्‍कृत भारी । राजसे ।
असें किल्‍मिष कोण निवारी । राजसे ।

उठाव ॥    
तव कृपे वाचस्‍पती, जाले वंदु किती, वदविं यदुपतिचे गुणगण वदनीं ॥
तूं कृपे करूनि मम स्‍फुरविं परादिक वाणी ॥ जय० ॥२॥
        
आतां एकचि प्रार्थना, आणि तूं मना, बैस आननामाजिं तूं सदये ।
श्रीरामकृष्‍णगुणलीला वदविं निजलीलेंकरूनि माये ।
विश्रांति नसे तुजविना, माझिया मना, पुरवी कामना चित्तिं जे आहे ।
माते दासाभिमानी प्रगट हृद्भुवनिं येई जननीये ॥
    
चाल ॥    
गोविंदाप्रति मति द्यावी । राजसे ।
तव चरणीं प्रीति असूं द्यावी । राजसे ।
याविण अन्यत्र नसावी । राजसे ।
        
उठाव ॥    
हे आळ, पुरविं लडिवाळ, करीं प्रतिपाळ, पोटासि धरुनि ॥    
तूं कृपा करुनि मम स्‍फुरविं परादिक वाणी ॥ जय ० ॥३॥

पद २०० वें.

ये नरहरि ! राया ! कीर्तनीं ॥ ध्रुवपद.॥
आवडी देईं तव गुण गाया । निजजनसुखसदया ॥ कीर्तनीं० ॥१॥
दिव्य सभासद भागवतोत्तम आले श्रवण कराया ॥ कीर्तनीं० ॥२॥
गोविंद प्रभु नाथ नृसिंहा । भगवज आंवराया ॥ कीर्तनीं० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP