रामकविकृत पदें १३१ ते १३३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १३१ वें.
हरी कसा नेईल निजधामा ? ॥ध्रुवपद.॥
विषयाचि प्रीति धरितो निशिदिनि । म्हणोनि विसर रामा ॥हरी०॥१॥
वेद आज्ञाजुक्त कर्मेंही करितो । फल इच्छा स्वर्गकामा ॥हरी०॥२॥
शास्त्राभ्यासे शब्दज्ञान जालें । तेणें तुझा नाहीं प्रेमा ॥हरी०॥३॥
अहं आप्तवर्ग याचा मना लोभ । पास्तव चुकलों नेमा ॥हरी०॥४॥
नरतनुप्राप्ति सार्थक नाहीं । भ्रमलों या भवभ्रमा ॥हरी०॥५॥
राम म्हणे कृष्णा ! शरग तुज । कृपा करी पुरुषोत्तमा ! ॥हरी०॥६॥
पद १३२ वें.
काय बोलों निजपदींची बाई ! मात ॥ध्रुवपद.॥
जिकडे तिकडे तिकडे घनरूप भरलें । द्दश्य लया गेलें अकस्मात ॥काय०॥१॥
माझें मीपण अवघें गेलें । पूर्णानंद जाला सहजांत ॥काय०॥२॥
माया आहे नाहीं याचि होती भ्रांति । आतां गेली स्वस्थ निवांत ॥काय०॥३॥
अवघा चिद्विलास असे । भक्तिप्रेमें सतत सुखांत ॥काय०॥४॥
राम म्हणे कृष्णाचरणीं शरण । तव स्मृति असो हृदयांत ॥काय०॥५॥
पद १३३ वें.
सावध होई हें बरें । प्राण्या रे ! हरितें ध्याईं त्वरें ॥ध्रुवपद.॥
इंद्रियनिग्रह विषय त्यजुनि । प्राणापान समता रे ।
सहस्रदळावरि जाउनि । मना स्थिर करीं रे !॥सावध०॥१॥
सत्कर्म करूनि निरहंकृति । ईश्वरी त्यजीं रे ! ।
तस्य प्रसादात मोक्षपद तूं । पावसि लौकरी रे !॥सावध०॥२॥
नवविध भक्ति सतत करुनि । कीर्तनीं प्रेम धरीं रे ! ।
भूतीं देव भावें धरुनि । जन्ममरण वारीं रे !॥सावध०॥३॥
अच्युतसुत राम म्हणे । सार्थक हेंचि रे ! ।
पांडुरंग वदुन नित्य । अनन्य होईं रे !॥सावध०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP