गोविंदकृत पदें १९३ ते १९५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १९३ वें
येईं कीर्तनि माराई ! माझे आई ! । सखे बाई ! ।
षड्भुजें कवळोनि क्षेम देईं. ॥ ध्रुवपद. ॥
त्रितापाग्नीनें तप्त माझी काया । गणराया ! ।
कृपांबूनें निववीं देवराया ! ।
भक्तवत्सल हें ब्रिद तुझ्या पाया । गौरीतनया ! ।
ब्रह्मादिकां अनिवार तुझी माया. ॥ येई० ॥१॥
नाहिं पुण्याचा लेश कांहीं केला । संग्रहाला ।
पातकी मी हा जन्म वृथा गेला ।
असा प्रस्तर जन्मास देह आला । अभाग्याला ।
कसा देवा तारिसी या दीनाला ॥ यई ० ॥२॥
तुझ्या नामें जळताति दोष बा ! रे ! । तुं कसा रे ! ।
व्यास देवें वर्णिलें गुह्य सारें ।
विनायका सिद्धिविनायका रे ! तारका रे ! ।
सख्या उद्धरिं गोविंदबाळका रे ! ॥ यईं० ॥३॥
पद १९४ वें.
मयूरेशा धांव रे ! स्वानंदपुरनिवासा ॥ ध्रुवपद.॥
हा अभिमान महाखळसिंधू । जाचित यावें तमाशा ॥ म० ॥१॥
बोध करीं घेउनि फरशायुध । यावें विघ्नविनाशा ॥ म० ॥२॥
भक्तकामकल्पद्रुम हें ब्रिद । सांभाळीं जगदीशा ॥ म० ॥३॥
दीन गोविंद करद्वय जोडुनि । प्रार्थितसे हृदयविलासा ॥ म० ॥४॥
पद १९५ वें.
गणराया येई रे ! । या कीर्तनि नृत्य कराया ॥ ध्रुवपद.॥
कार्यारंभीं सकळ तुज पूजिति । प्रार्थिति विघ्न हराया ॥ गण० ॥१॥
हंसासनिं बैसुनि विविधतनया । सादर तव गुण गाया ॥ गण० ॥२॥
भक्ताची मनोवांच्छित सिद्धि । दासां वर दे वराया ॥ गण० ॥३॥
गोविंद प्रभु द्वयकर जोडुनि । वंदितसे तव पाया ॥ गण० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP