कृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १३८ वें.
अनुभवचोळी लेउनि साजणी निमग्न मी झालें ।
परात्पर चिन्मयरूप नयनीं देखिलें ॥ध्रुवपद.॥
प्रपंचमाया सोडुन सखये ! झालें मी वेडी ।
आशा मनशा तृष्णा सोडुनि झालें मी उघडी ॥
काम क्रोध हा लोभ साजणी ! केला देशधडी ।
पंचविषय हा व्यर्थ पसारा विवेकबळें रगडी ॥
चौं देहांचा निरास करुनि गेलें पैलथडी ।
सद्नुरुकृपें कुकूं लेउनि त्रिगुण गुंती तोडी ॥
मोह वासना ममता यांची केली कंथा साडी ।
करिं धरुनी सद्नुरुनें दिधली चिद्रत्न जोडी ॥
त्रिवेणीसंगमीं स्नान करोनी चोळी मी ल्यालें । परात्पर०॥१॥
काय सांगूं सख्ये ! बाई ! नवल मी सद्नुरुची करणी ।
चिद्रूपाची चोळी मजला दिधली बेतोनी ॥
पंचरंगीं हें रेशिम सुंदर केलीसे आटणी ।
पांच पंचविस डूल छत्तिस पाहिले नयनीं ॥
तुकडे प्रेमसुईनें केलीसे जडणी ।
चंद्रसूर्य हे दोहों वाहयांसि प्रकाश कोंदणीं ॥
अधोमुखी ही नागिण सुंदर नांव कुंडलणी ॥
षडचक्राचा भेद करुनी निवांत मी झालें । परात्पर- ॥२॥
चार सहा दहा बारा पाहिलें कमळ ।
षोडश दोन सहस्र दळांचा मार्ग हा अचल ॥
सत्रावीचें पान करोनी झालें मी व विमळ ।
इडा पिंगळा मार्ग सुषुम्ना तपस्वी बाळ ॥
आउट पीठ गोल्हाट वाट ही सरळ ।
झगमग नयनीं ज्योत देखिली विचित्र हा खेळ ।
शुद्धस्वरुपी मन वेगळें झाले मी सुशीळ ॥
अक्षय चोळी आंगीं लेउन सोंवळी मी झालें । परात्पर० ॥३॥
आणिक एक म्यां नवल देखिलें उफराटा पिंजरा ।
तीनशे साठ तुकडे जोडून केलासे पुरा, ॥
बाहात्तर खोल्या सांधे सोळा नवखंड वसुंधरा, ।
स औट कोटी पाहे शरीरा ॥
एकविस मणके, माळ साजिरी पाहें तूं माधारा ।
जें ज एं पिंडीं तें ब्रम्हांडीं बोले वेदगिरा ॥
सदुरुकृपें अनुभव जाणुनी वाचे मौन्य धरा. ।
सच्चित्मुखघनरुप पाहुन तल्लिन मी झाल्ये. । परात्पर० ॥४॥
बारा सोळा एकविस हजार अखंड दिननिशीं ।
अहोरात्र हे माप चालिलें पहा तुम्ही त्यासी ॥
‘सोऽहं’ ध्यानीं लक्ष्य लावुनी पहा स्वरूपाशी ।
त्रैलोकींची चोळीरचना माझी ही सुरसी ॥
सद्नुरुचरणा शरण जाउनी जन्ममरण निरसी ।
द्दश्यपदार्थात्पांग करोनी अक्षय तूं होसी ॥
माझें रुप मज दाविलें आश्वर्य मानसी ।
चिन्मय चोळी लेउन शरण सद्नुरुशीं ॥
करीं धरोनी कृष्णकिंकरा निजपद दावीलें. । परात्पर० ॥५॥
पद १३९ वें.
मी अपराधी खरा । विठोबा ! तारी दयासागरा ! ॥ध्रुवपद.॥
या भवडोहीं बुडतों मी पाहीं । नेईं तूं पैलतीरा. ॥विठोबा०॥१॥
षदरिपु जळचर ओढिती मजला । धांव वेगीं गिरिधरा ! ॥विठोबा०॥२॥
लक्षचौर्यायशीं फेरे फिरतां । श्रमलों कमलावरा ! ॥विठोबा०॥३॥
पतितोद्धारक नाम जगत्रयीं । पिटी निगम दांडोरा. ॥विठोबा०॥४॥
कृष्णकिंकरा पाहीं कृपेनें । देईं चरणीं थारा. ॥विठोबा०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP