गोविंदकृत पदें २७१ ते २७३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २७१ वें.
राम हो ! माझ्या प्राणाचाहि प्राण । पाहतां वाटे माना समाधान ! ॥ध्रुवपद.॥
सगुणरूप गुणाचा सागर । वेष्टियला कासे दिव्य पीतांबर ।
कुंडल कर्णी, कंठीं मुक्तहार । गाजतो पायीं ब्रीदाचा तोडर ॥राम०॥१॥
अंगुलीमध्यें मुद्रिकेचि शोभा । मुगुटी दिव्य भास्कराची प्रमा ।
श्यामता ज्याची लाजवीत नमा । तो राम सिंदुरगडावरी ऊभा ! ॥राम०॥२॥
देखतां ज्याचें प्रसन्नवदन । ते ठायीं माझें गुंतलेंसे मन ।
नसिक सरळ, आकर्ण नयन । पाहतां मूर्ति जाहलें समाधान ॥राम०॥३॥
वामांशी उभी जनकाची बाळा । गौरांगी असे लावण्याची कळा ।
नरहरिरायें दाखविलें डोळा । गोविंद रामा पाडुनी आनंद्ला ॥राम०॥४॥
पद २७२ वें.
राम हो ! माझ्या जिविचे विश्राम । त्याविण होतो देहाला बहुत बहुत श्रमा ! ॥ध्रुवपद.॥
पाहिली बहु संसाराची सोये। सुख ना, दु:ख त्यामाजी होताहे ।
वासना स्थिर कदापी न राहे । रामाविना सर्वही अपाये ॥राम०॥१॥
जाहला देह संतप्त त्रितापें । नाचती जन्मजन्मांतरींची पापें ।
नासुचें कांहीं तेणें देह कांपे । दिसतें नाम श्रीरामाचें सोपें ॥राम०॥२॥
पातकी जन नामानें तरले । वाल्मिकादिक दोषी उद्धरले ।
विश्वासें तें म्यां अंतरीं धरिलें । गोविंदाचें मन त्यामाजी रंगलें ॥राम०॥३॥
पद २७३ वें.
धन्य दिवस आज सोनियाचा झाला ।
भुळावीण श्रीराम घरा आला हो ! ॥ध्रुवपद.॥
पूर्वपुण्य संपूर्ण फळा आलें ।
कूटस्थातें सगुण देखीयेलें ॥धन्य दिवस०॥१॥
बहू जन्मांचे सार्थक मजला झालें ।
सर्वहि पर्वे दर्शन आजी घडलें ॥धन्य दिवस०॥२॥
गोविंदाची वासना पुरविली ।
नृसिंहानें मजवरी कृपा केली. ॥धन्य दिवस०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP