रामकविकृत पदें १११ ते ११४
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १११ वें.
कृष्ण हरिर स्मर तूं । सतत ॥ध्रुवपद.॥
अरे ! हे अशाश्वत । द्दगद्दश्य विपरित ।
लोभ तुला बहुत । याचा त्याग करीं त्वरित ॥सत०॥१॥
विषयाचा छंद धरिसी । निशिदिनि क्रीडा करिसि ।
तृप्ति नाहिं वासनेसी । हानी केली आयुष्यासि ॥सत०॥२॥
निरहंकृति कर्म आचरीं । भूतीं देवभाव धरी ॥सत०॥३॥
एक हरि हृदयी ध्याई । येणें तुझा मोह जाई ।
निजरूपी सुख घेईं । ब्रम्हानंदी तल्लीन होई ॥सत०॥४॥
राम म्हणे हें साधन । प्रेमभावें भक्ति करून ।
गुरुचरणी रत हौन । कैवल्यपदी हो अनन्य ॥सत०॥५॥
पद ११२ वें.
आजि राम मीं ध्याइला । तेणें अहंभाव सर्व नासिला ॥ध्रुवपद.॥
योगियाच्या हृदयीं रमे । तोचि पिंडब्रम्हांडीं देखिला ॥आजि०॥१॥
सगुण निर्गुण राम । हाचि सतत स्मर प्रकाशिला ॥आजि०॥२॥
अवघा चिद्विलास असे । येणें मायामोहो भ्रम संपला ॥आजि०॥३॥
राम म्हणे कृष्ण शरण । कैवल्यपदी ठाव द्यावा मला ॥आजि०॥४॥
पद ११३ वें.
सावध होईं रे होईं रे ! जन्ममरण चुकवीं रे ! ॥ध्रुवपद.॥
नरतनुंत आलासि । विपरीत द्दश्यातें भुललासि ॥सावध०॥१॥
प्रारब्धाधीन देह । कर्तृत्वाचा कां आग्रह ॥सावध०॥२॥
व्यापक हरिची सत्ता । नको अहंकार अहंकार धरूं आतां ॥सावध०॥३॥
अरे ! आलासि कोठुन । हेम मूळ पाही तूं शोधुन ॥सावध०॥४॥
आतां भ्रांति सोडी । हरिचरणाचि घे गोडी ॥सावध०॥५॥
एक आत्मा पाही । हेचि स्मृति धरीं हृदयी ॥सावध०॥६॥
अंतरबाम्हा देव । हाचि करीं भक्तिभाव ॥सावध०॥७॥
राम म्हणे सार्थ करीं । कृष्णचरणीं प्रेम धरीं ॥सावध०॥८॥
पद ११४ वें.
कृष्णा शेवटीं मज सांभाळीं ॥ध्रुवपद.॥
अनाथासि पावन करीं नारायणा ! । ठाव देईं चरणाजवळी ॥कृष्णा०॥१॥
जन्मोजन्मी सेवा केली बहुपरी । निजसुख देईं वनमाळी ॥कृष्णा०॥२॥
कृष्णा ! तुझा देवा स्मर सतत असावा । मग भय नसे कोणे काळीं ॥कृष्णा०॥३॥
राम म्हणे अनन्य गोविंदा गोपाळा । कृपा पूर्ण करीं अंतकाळीं ॥कृष्णा०॥४॥
Last Updated : November 11, 2016
TOP