गोविंदकृत पदें २२१ ते २२३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २२१ वें.
श्रीरंगा येईं रे ! योगीजनमानसहंसा ! ॥ध्रुवपद.॥
कसासुरहरणा भवतरणा । करुणाब्धे नतजनसुखकरणा ! ।
दीनोद्धार असे ब्रिद पायीं धांव पाव श्रीरुक्मिणीरमणा ! ॥श्री०॥१॥
गोपाळा गोपबाळमित्रा । गोवर्धनधरणा मृदुगात्रा ।
गोपीप्रिय गंगाधरप्रियकर गुणसिंधु कालिंदीकलत्रा ॥श्री०॥२॥
भक्ताची मनोवांच्छित सिद्धि । काळ उभा लक्षितसे संधी ।
बंदी तुझा गोविंद प्रार्थित बंध चुकवी हे किल्मिषदहना ! ॥श्री०॥३॥
पद २२२ वें.
गोविंदा ! रामा ! ये रे ! । गोपाळा ! रामा ! ये रे ! ।
भक्तकामकल्पद्रुम नरहरे ! मजला क्षेम दे रे ! ॥ध्रुवपद.॥
क्रोधनक्र विदारुनि चक्रें दिग्गज गज उद्धरिला ।
आलिंगुनी कनवाळा हृदयीं मुक्तपदाप्रति नेला ॥गोविंद०॥१॥
घेउनि तव स्वरुपातें कौळिक नृपकन्ये रत झाला ।
अति संकटी आळवितां तुजला आपणाऐसा केला ! ॥गोविंद०॥२॥
मी तंव सर्व गुणें हिन देवा सुकृत नाहीं पदरीं ।
दीन गोविंद अधमनरकेसरी, करुणार्णव ! मज तारीं ॥गोविंद०॥३॥
पद २२३ वें.
गोकुलवासा गोपविलासा गोपाला गरुडविहारा ! ।
गोवर्धनधरणा अघशमना गोरसहरणा सकुमारा ! ॥ध्रुवपद.॥
शरणागतवत्सल ब्रिद पायी गाजतसे सकळा भुवनीं ।
ऐशी शास्त्रमुखांतील वाणी म्यां ऐकिली बापा श्रवणी ।
हा निश्चय मनीं जडला म्हणवुनि आलों शरण जोडुनियां पाणी ।
आणिक कोणी नसे मज त्राता येईं त्वरें पंकजपाणी ॥
उठाव ॥ भक्तकाजकल्पद्रुम म्हणती तुजलागुनि नंदकुमारा ॥गोव०॥१॥
गज नक्रें गंडिकापतंजळी आक्रमि व्याकुळ झाला ।
होती गात्र शिथिल सर्वहि तें तेव्हां प्रार्थियलें तुजला ।
मुक्तपुरी असती गरुडासन त्यागुनिया सत्वर आला ।
गज केला आपणासम प्रभुजी ! उद्धरिलें त्या अधमाला ।
उठाव ॥ एवढी लाज तुम्हां बिरुदाची दावी वदन भवनदी तारा ॥गोव०॥२॥
प्रर्हादास्तव स्तंभ विदारुनि मर्दियला दुर्जन समरी ।
मज पतिताला त्राता कोणी आन नसे बा कंसारी ! ।
पतितपावन नाम तुझें मज तारुनि, सखया ! सत्य करीं ।
याविरहित गोविंददिनाची आणिक न वदे वाणि हरि ॥
उठाव ॥ भक्तांची मनोवांछित सिद्धि म्हणउनियां तिष्ठत द्वारा ॥गोव०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP