मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
रामकविकृत पदें १०१ ते १०३

रामकविकृत पदें १०१ ते १०३

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १०१ वें.

रुक्मिणीवरा ! मनोहरा । मज दीनातें उद्धरा ॥ध्रुवपद.॥
मी अपराधी काम्य कर्म करूनि ।
फळहेतु स्वर्गसुख करीं इच्छा धरूनि ।
भोग आशा बहु परि तृष्णा मनीं ।
यास्तव अंतर पडलें तुझ्या कीर्तनीं ॥रुक्मिणी०॥१॥
अहं देह धर्म धरूनि घ्यास करितों ।
लोभ सतत म्हणुन अपुले म्हणतो ।
गृहपुत्रदारा येथें निशिदिनि रमतों ।
येणें मी निमग्न भ्रमांत श्रीहरी बुडतों ॥रुक्मिणी०॥२॥
आतां वनमाळी तूं पूर्ण कृपा करीं ।
मायामोह नासून भवसिंधु उतरीं ।
भक्तिपद देउनि स्मृति दे अंतरीं ।
राम अनन्य तव चरणीं मुरारी ! ॥रुक्मिणी०॥३॥

पद १०२ वें.

श्रीहरिचरणी सतत लीन व्हा रे ! ॥ध्रुवपद.॥
आशाभवतृष्णी लोभ त्यजुनियां ।
एक गोपाळ मनीं घ्याय जा रे ! ॥श्रीह०॥१॥
जो परात्पर अलक्ष अगोचर ।
निशिदिनि अंतरीं रमत जा रे ! ॥श्रीह०॥२॥
अहं धर्म दुर्ग द्दश्य विसरुनि ।
निर्निमित्य अनादि असत जा रे ! ! ॥श्रीह०॥३॥
निर्गुण सगुण भगवान व्यापक ।
हा चिद्विलास मुखीम गात जा रे ! ! ॥श्रीह०॥४॥
राम म्हणे द्वैतभ्रांति निरसुनि ।
कृष्ण्पदी तुम्ही अनन्य रे  ! ॥श्रीह०॥५॥

पद १०३ वें.

रुक्मिणीकांत कां अजुन नये श्रम अहर्निशी ॥ध्रुवपद.॥
अध्यय अपवाद करुनि । दु:ख भोगिलें निशिदिनिं ।
आतां मी दीन हीन ग्लान विनवितों हृषीकेशी ॥रुक्मि०॥१॥
कृष्णा ! माझा अंत पाहसि । क्लेश होती अनेकविसि ।
भक्तवत्सल दीनोद्धार हें ब्रीद वागविशी ॥रुक्मि०॥२॥
त्रिविधताप हे प्रचंड । जाळती क्रूर अखंड ।
येणें जिव माझा व्याकुळ पडिलों भ्रमासी ॥रुक्मि०॥३॥
तुला भक्त अनेकपरि ।  म्हणुनि  माझा विसर हरि ।
आतां झडकरि येउनि तव स्मृति दे लरेसीं ॥रुक्मि०॥४॥
अच्युतसुत राम  विनवी । माझी करुणा परिसावी ।
मज दिनातें उद्धरीं न ठाव दे चरणासी ॥रुक्मि०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP