गोविंदकृत पदें २३३ ते २३५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २३३ वें.
दम घर मजला सोड । हरि ! रे ! ॥ध्रुवपद.॥
किति करशिल रळी धरुनि पदरीं । जबुन तुझी हे खोड हरि रे ॥दम०॥१॥
मथुरेला मज जाऊं न देसी । देईं नवनीत गोड हरि रे ॥दम०॥२॥
गोविंदप्रभु नरहरिराया । केली तव पदी जोड हरि रे ॥दम०॥३॥
पद २३४ वें.
निरंजनीं अनुहात वेणु वाजे ।
जालें तटस्थ ऐकतां मन माझें हो ! ॥ध्रुवपद.॥
श्रवण माझे गुंतले वेणुनादीं ।
मनोवृत्ति गुंतली ब्रम्हानंदीं ।
अहंकर सासुरा मेला द्वंद्वीं ।
यानें धातलें संसारसुखाच्या बंदीं हो ! ॥निरंजनी०॥१॥
गृह नोहे कारा मातें वाटे ।
काय करूं मी प्रारब्ध माझें खोटें ।
क्षणक्षणा आयुष्यकाळ लोटे ।
पूर्वार्जित आडवें पडलें मोठें ॥निरंजनी०॥२॥
दैवयोगें भेटली नरसाबाई ।
भावें माथा ठेविला तीचे पायी ।
कान फुंकोने दाविले डोळां कांही ।
वृत्ति बुडाली स्वानंदसुखाच्या डोहीं कान ॥निरंजनी०॥३॥
चित्रविचित्र दाविलें नरहरिरायें ।
त्याची गोडी सांगतां मुखी नये ।
प्राण गेल्या न सोडी त्याचे पाय ।
गोविंदाची विश्रांति सद्रुरुमाये ॥निरंजनी०॥४॥
पद २३५ वें.
मंद समिर गति मंजुळ मुरहर वाजवितो पावा ।
तो हरि मजला दावा ! ॥ध्रुवपद.॥
नम्र करुनि शिर संभ्रम करद्वय जोडुनि सखिचरणी ।
मस्तक ठेवी धरणीं ॥
शुभ वस्र जरितगट जडित घे अचल कुचावरुनी ।
डोलति कुंडल श्रवणी ॥
गोमेदोत्पलपाचरत्नमणिहार हृदयभुवनीं ।
साजे मस्तकिं वेणी ॥
चाल ॥ अरुणापरि कुंकुम भाळी ।
वरि मुक्तफळांची जाळी ।
तांबुल अधरपुटकमळीं ॥
उठाव ॥ मोरजडित मुदराखडि वरि केतक बदरी लावा ॥तो हरि०॥१॥
हस्त धरुनि मन स्वस्थपणें करि कस्त पुढें जाया ।
ते अनयाची जाया ॥
गस्त चुकुनि अलि मस्तपणें श्रीहरिचे पद पहाया ।
आलापित यदुराया ॥
दुस्तर हा भवसागर सत्वर परतिर उतराया ।
शुक म्हणे, परिमें राया ! ॥
चाल ॥ गंभीर गिरा करि स्तवन ।
हंसापरि जीचे गमन ।
क्षणक्षणा सखिसि करि नमन ॥
उठाव ॥ शारदेंदुवदना म्हणती दिठि मुरलीधर पहावा ॥तो हरि०॥२॥
विरह विकळ गळगळ स्त्रवती द्वयनेत्र कुचावरती ।
अधरोष्ठ उभय स्फुरती ॥
वनचर पशु तर वैर त्यजुनि राधेभंवते भ्रमती ।
पक्षी गजबज करिती ॥
साधुसंगमी निमग्न होऊनि कृष्णस्मरण करिती ।
राधेचा श्रम हरती ॥
चाल ॥ हेमधुमुरनरकविनाशा ! ।
स्वामी रे रमाविलासा ! ।
नीवारीं सकळ भवपाशा ॥
उठाव ॥ श्रीसद्नुरु न्रहरिपदकमळीं गोविंदा लावा ॥ते हरि०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP