मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २६१ ते २६३

गोविंदकृत पदें २६१ ते २६३

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २६१ वें.

दाशरथे ! रामा ! । करुणाब्धे ! ॥ध्रुवपद.॥
मज पतिताला तारक न दिसे । तुजविण गुणाग्रामा ! ॥करुणाब्धे०॥१॥
शरणागताव्हेर न करिसी । दे चित्सुखधामा ॥करुणाब्धे०॥२॥
अधमोद्धारण हें ब्रिद पायीं । सांभाळी रामा ! ॥करुणाब्धे०॥३॥
गोविंद प्रभु नरहरिराया ! । योगीविश्रामा ॥करुणाब्धे०॥४॥

पद २६२ वें.

भक्तवत्सला दयाब्धि ! तारिं तूं मला ।
भानुवंशभूषणा सुगात्रकोमला ! ॥ध्रुवपद.॥
साकेतनिवास आस माझि पूरवीं ।
नासुनि अज्ञान ज्ञानि वृत्ति फीरवीं ।
तू त्रिभुवनाधीश चिदाकाशिंचा रवी ।
निर्गुण निर्द्वद्वरुपा भ्रांति नूरवीं ॥भक्त०॥१॥
हौनी जळांत मीन शंख मारिला ।
मंदराद्रि धरुनि पृष्टिं सिंधु तारिला ।
क्रोडरूप धरुनि हिरण्याक्ष चीरिला ।
प्रबळ हिरण्यकश्यपूता नखें विदारिला ॥भक्त०॥२॥
हौनि वामन बळि पाताळीं घातला ।
सहस्त्रार्जुन प्रबळ क्षात्रमदें मातला ।
परशायुध घेउनि यमलोक दाविला ।
तो तूं रघुवंशीं रघुनाथ जन्मला. ॥भक्त०॥३॥
चंडधनुर्दंडधारका रघुत्तमा ! ।
दंडधर प्रचंड भय निवारिं उत्तमा ।
खंडुनि दशमुंड मुक्तिदा अनुत्तमा ।
स्थापुनियां धर्म रक्षिसी द्विजोत्तमा ॥भक्त०॥४॥
मान वचन दीन मी गुमान दुर करीं  ।
सच्चिद्रुप दाखवीं दीननाथ लौकरीं ।
जालों मी अनन्यशरण तूज नरहरी ।
आस पुरवीं दास गोविंदास करिं धरीं ॥भक्त०॥५॥

पद २६३ वें.

रामचंद्र प्रभो ! रामचंद्र प्रभो ! रामचंद्र प्रभो ! रामचंद्र प्रभो ! ॥ध्रुवपद.॥
द्शमुखदर्पविनाशा । सीतामानसहंसा ॥राम०॥१॥
गोतमसतिउद्धरणा । भार्गवरणमदहरणा ॥राम०॥२॥
शरयूतीरविहारा । स्वस्त्रीसुखदातारा ॥राम०॥३॥
ब्रम्हानंदसमुद्रा । रामा प्रतापरुद्रा ॥राम०॥४॥
सद्रुरु नरशार्दुला । गोविंदवरद दयाळा ॥राम०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP