रामकृष्णकृत पदें ७१ ते ७३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ७१ वें.
धांवा धांवा धांवा उद्धवा ! आणा माधवा |
अक्रूर नव्हे हा क्रूर साधिला दावा ॥ध्रुवपद.॥
पहा पहा अक्रुरे कसा कापिला गळा ।
नेलें मथुरेशीं बळराम आणि गोपाळा ।
त्या दिवसापासुन गोकुळास आली अवकळा ।
रात्रंदिवस चैन पडेना, लागेना डोळा ॥
चाल ॥ अशि काय कुब्जा चांगली मोठी सरस ।
तिसीं जाउन रतला, धरुन आमचा हिरस ।
विरहें तळमळतों आम्हां लागला चिरस ॥
टीप ॥ एकदां येउन व्रजवधूंचा कंठ बधावा. ॥धांवा०॥१॥
ब्रम्हाज्ञनाची कथा सांगतां वृथा ।
हा पूर्णब्रम्हा राधिकेशीं रतला होता ।
रथी गुप्त होउनि बैस्ला आम्हां देखतां ।
येतो मी म्हणुनि सकळांसी दिधला गोता ॥
चाल ॥ हिकडेचि आम्ही झुरझुरुन जाऊं मरुन ।
येथें कितिक दिवस धीर धरून राहावें ठरुन ।
कधिं पडतिल द्दष्टी फिरुन डोळां भरून ॥
टीप ॥ शिणलो नवस करकरुन हरीचा धांवा ॥धांवा०॥२॥
कंसासी वधूनि राज्याचे जाहले धनी ।
त्यामुळें आमचा लोभ दिला सोडूनी ।
कसा दोर अर्धा आडामाजी कापुनी ।
वाटतो त्यजावा प्राण सर्व त्यागुनी ॥
चाल ॥ होता रुसवा येती न तिनदां घरास ।
यमुनेतीरीं अडवि जैशी याची मिरास ।
मधुवनीं खेळतां रास भुवनसुंदरास ॥
टीप ॥ वाटतो योग असा सर्वदा साधावा ॥धांवा०॥३॥
पाहोनी गोपींचा भाव म्हणे उद्धव ।
अंतरी व्यापिला देव केवढें दैव।
त्यागोनि आपुले धव रमती माधव ।
अंतरी धरा श्रीधरा असें बोधावें ॥
चाल ॥ रविबिंब जसें का दिसे सकळिका घटांत ।
जगदीश व्यापिला असे की तंतुपटांत ।
यापरी पहा श्रीहरी हृदयसंपुटांत ॥
टीप ॥ म्हणे रामकृष्ण साधनीं असा साधावा ॥धांवा०॥४॥
पद ७२ वें.
धाडुं नको वनिं राम कैकयी ! ॥ध्रुवपद.॥
वृद्धपणीं मज चारही बाळें ।
प्राणाचा रघुपति विश्राम ॥धाडुं०॥१॥
अति सकुमार कुमार रवीचा ।
कोमल तनु घनश्याम ॥धाडुं०॥२॥
रामकृष्णप्रभु द्दष्टी न पडतां ।
जाइन मी निजधाम ॥धाडुं०॥३॥
पद ७३ वें.
कधिं येतिल गोकुळासि सांग उद्धवा ! ।
वाटतें जीवासि भेटवा रे ! माधवा ! ॥ध्रुवपद.॥
गहिंवरोनि रडती सकळ पडती गोपिका ।
कुरळ केश विरळ रुळताती मृत्तिका ।
अनुसरलों आम्ही, न लभे जो शुकादिकां ।
तो कसा असेल कीं येइल केधवां ? ॥कधिं०॥१॥
न रुचे तृणनीरक्षीरपान वांसरां ?
नंद यशोदेसि बैसलासे धोसरा ॥
कुब्जा कमनीय रूप दिसे अप्सरा
ती कशी तुटेल, तो सुटेल केधवां ? ॥वाटतें०॥२॥
निष्ठुर अक्रुर क्रूर बहुत वाटला ।
करुनि लंदफंद हळुच नंद फासला ।
नेला मथुरेस, ईश स्वस्थ बैसला ।
मोकलिती धाय ! हाय हाय माधवा ! ॥कधिं०॥३॥
उद्धव म्हणे थोर भाग्य फार चांगल्या ।
जडला विश्वास निजरूपात लागल्या ।
रतला श्रीरंग निजरंगीं रातल्या ।
दाविताति ग्लानी रामकृष्ण बोधवा ॥वाटतें०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP