मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गिरिधरकृत पदें १४८ ते १५४

गिरिधरकृत पदें १४८ ते १५४

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १४८ वें.

ये रे ! ये रे ! नंदलोशेरा ! रे ! । गोपिविहारा ! रे ! ।
अधरिं धरुनि मधुर मधुर मुरली वाजविशी पोरा ! रे ! ॥ध्रुवपद.॥
गोपललना तुजला ध्याती । कळला आहेसी चोरा रे ! ॥ये०॥१॥
अझुनी कां रे ! सोय न धरिसी । करिसी ब्रजसंचारा रे ! ॥ये०॥२॥
गिरिधरांकित चरणीं तुझ्या । मागतसे निजथारा रे ! ॥ये०॥३॥

पद १४९ वें.

बाई ! गे ! हा वनमाळी । आहे कानडा कपटी. ! ॥ध्रुवपद.॥
गोरसहारी गोधन चारी । राजित पीतपटीं. ॥बाई०॥१॥
मुरलीरवें मोहित व्रजललना ।  क्रीडत यमुनातटीं. ॥बाई०॥२॥
गिरिधरांकित प्रेमरसें तुज । ध्यात हृदयसंपुटीं. ॥बाई०॥३॥

पद १५० वें.

आम्हीं देखिला माय ! तो श्रीहरी. ! ॥ध्रुवपद.॥
जो का नित्य निर्विकार । ज्याचा नकळेची पार ।
तोची जाहला साकार । स्थान चिमुर ज्याचें. ॥आम्हीं०॥१॥
ब्रम्हाचैतन्य केवळ । जो का अनादीचें मूळ ।
जेणेम विश्व हें सकळ । इच्छामात्रें निर्मिलें. ॥आम्हीं०॥२॥
ज्याचा धरितां निजध्यास । तोडी जन्ममृत्युपाश ।
गिरिधर अंकिताची आस । स्वपदासी पाववीं. ॥आम्हीं०॥३॥

पद १५१ वें.

गाईं माधव हा मधुपुरीचा ।
रमारमण हा ध्याईं अंतरीं हा विसावा मनिंचा ॥ध्रुवपद.॥
नदितटीं अधिष्ठान जयाचें । तो हा विलासी वृंदावनिंचा ॥गाईं०॥१॥
प्रतिवर्षीं जन यात्रा ज्याची । नंदनंदन आणि यशोमतिचा ॥गाईं०॥२॥
गिरिधर अंकित अंकीं तूझ्या । तारी भवांतुनि स्वामी आमुचा ॥गाईं०॥३॥

पद १५२ वें.

तारीं तूं  मजला श्रीराघवा ! । जानकीधवा ! हो ! रामा ! ॥ध्रुवपद.॥
रविकुलभूषणा ! नीरजलोजना ! । शोभतसे अंकीं रामा ॥तारी०॥१॥
दशरथनंदना ! दशमुखभंजना ! । वर्णितसे शिवौमा ॥तारी०॥२॥
गिर्धर अंकित तुजला प्रार्थित । नेईं त्वरें निजधामा ॥तारी०॥३॥

पद १५३ वें.

मुरलीधर हा समजावा. ! ॥ध्रुवपद.॥
त्याविण क्षणपळ युगसम वाटे । घेउनि येईं विलंब न लावा ॥मुर०॥१॥
तनु विरहें विगलित वो ! झाली । कोणितरी हरि नयनीं दावा ॥मुर०॥२॥
गिरिधर अंकित त्याविण दु:खित । मज गमतो आज प्राण त्यजावा ॥मुर०॥३॥

पद १५४ वें.

भक्तीं आकळिला ।  कृपाघन भक्तिसि आकळिला. ! ॥ध्रुवपद.॥
पार्थरथी सारथ्य करी जो । निजपद दे बळिला. ॥कृपा०॥१॥
प्रर्‍हादास्तव प्रगटोनि स्तंभीं । दानव निर्दळिला. ! ॥कृपा०॥२॥
रुक्मिणीनें एक तुलसिदलानें । गिरिधरप्रभु तुलिला. ॥कृपा०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP