गोविंदकृत पदें १९१ ते १९२
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १९१ वें
श्रीगणराज वरदकरमंडित विघ्नहरण शुभदानी ।
लंबोदर गुणमंदिर सुंदर सुरवरनरवरदानी ॥ ध्रुवपद.॥
सिंदुरचर्चित दिव्य तनू पितांबर जघनिं विलासे।
मंदरसम अतिसुंदर वपुवारि रविशशितेज प्रकाशे ॥ श्री० ॥१॥
ध्वजवज्रांकुश चिन्ह सकळ शुभयुग्म पदाब्िंज विराज ।
नखिं दशधा शशि जडला पदिं ब्रिद पैंजण त्रिभुवनिं गाजे ॥श्री०॥ ॥२॥
नागकटी कटिसूत्र सरळ वरि नभिसरोजी हीरा ।
रत्नजडितकरभूषणारजित शिरीं विलसित शुभ चीरा ॥श्री०॥३॥
नागानन मनरंजन भंजन ध्यानें भवभजकांचा ।
शुंडा सरळ वितंड द्विरद अति चंडपराक्रम ज्याचा ॥ श्री० ॥४॥
गंडस्थळमदमंडित स्रवती भृंगावळि रस घेती ।
शूर्पकर्ण वारि वारितसे परि पुनरपि धांवुनि येती ॥ श्री० ॥५॥
मृगमदर्तिलकविराजित मायाललित कपोल विराजे ।
पाशांकुशशुल अंगुलिकांतरिं दूर्वांकुर शिरिं साजे ॥ श्री० ॥६॥
तो महाराज वरदगुरु गणपति अंतरसदनविलासी ।
सप्रेमें कनवाळु प्रसाद दिधला गोविंदासी ॥ श्री० ॥७॥
पद १९२ वें.
स्वच्छंदें नृत्य करीतो स्वानंदपुरनिवासी ।
त्रिभुवन जन मोहित झाले देहस्मृति नकळे त्यासी. ॥ ध्रुवपद. ॥
स्थिरचरजड चालविताहे सत्तेनें श्रीगणराणा ।
आरंभी स्तविती ज्यातें वंद्य श्रुतिशास्त्रपुराणा ।
ब्रह्मप्रियादिक सखे सारे, नर्तवितो लावुनि ध्याना ॥
चाल ॥
हालति ना पादप नाना ।
ॠषि मुनि तपि त्यागिति ध्याना ।
सुर विसरति अमृतपाना ॥ स्व० ॥१॥
गौतमसरिताजळ तेव्हां वाहतां ते वेग विसरली ।
नृत्यध्वनि मंजुळ तीच्या द्वयकर्णांच्या मधें शिरलीं ।
मृगव्याघ्रचमरि वैरातें त्यजुनि एके स्थळिं रमली ॥
चाल ॥
द्वेषबुद्धि सर्तहि हरली ।
मनोवृत्ति तयाची फिरली ।
गणपतिच्या ध्यानीं मुरली ॥ स्व० ॥२॥
ॠषिकांता सरितेलागी आणाया गेली पाणी ।
जलकुंभ भरूं विसरली तटिं बसली न भरी पाणी ।
कामिनि एक वेणी विंचरतां मस्तकीं गुंतला पाणी ।
चाल ॥
प्रेमाश्रु वाहती नयनीं ।
गणपति आणूं या ध्यानीं ।
डोलतसे भुजंगावाणी ॥ स्व० ॥३॥
वीणा घेउनि विधितनया गातसे मंजुळ शब्दें ।
मृदंग हरि वाजवितो तालावरि नानाछंदें ।
विमानावरि बैसुनियां पाहताति सुरांची वृंदें ॥
चाल ॥
दशशतफणि डोले आनंदें ।
निघती प्रेमाचे दोंदे ।
शिव नाचे ब्रह्मानंदें ॥ स्व० ॥४॥
यापरि तो सगुणावतारी स्वच्छंदें नृत्यकरिता ।
त्रिभुवनि स्थिरचर जिव सारे नाचति हृदि आनंदभारिता ।
गोविंद पुष्पांजळि घेउनि अर्पितसे गणेशमाथा ॥
चाल ॥
सप्रेमें तत्पदिं नमिता ।
तूं प्रसन्न हो वरदाता ।
वरद हस्त ठेवीं माथा ॥ स्व० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP