गोविंदकृत पदें २६४ ते २६६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २६४ वें.
मजवरि कृपा करीं देवराया ! । भक्ती शुद्ध वराया. ! ॥ध्रुवपद.॥
काय वृथा भूभार जन्मलों । द्विजयोनिंत रघुराया ! ॥मज०॥१॥
तुज अधमोद्धारण मुनि म्हणती । हें ब्रिद प्रभुच्या पाया ॥मज०॥२॥
कलिमाजी नामामृत सार हें । हा भवसिंधु तराया ॥मज०॥३॥
दीन गोविंद शरण तुज आलों । शाश्वत पद उमगाया ॥मज०॥३॥
पद २६५ वें.
तार समर्था देईं अनुज्ञा रामा ! राजिवनयना ! ।
गुणसमुद्रा सखया पन्नगशयना ! ॥ध्रुवपद.॥
तूं सर्वज्ञ समर्थ स्यियंतरसाक्षी ।
नित्य निरंतर ध्यातो तुज विरुपाक्षी ।
योगी निरंतर लाविति द्दष्टि अलक्षी ।
तो तूं सगुणस्वरूपा नतजनपक्षी ॥तार०॥१॥
तूं बुद्धीचा चाळक तूं सर्वहि कर्ता ।
अखिलोद्भव पाळुन तूं जगसंहर्ता ।
देह असे जड बापा तूं चालविता ।
नाही स्वतंत्र मी रामा तुझी सत्ता ॥तार०॥२॥
मी सर्वस्वी पतित शरण तुज आलों ।
तार किंवा ने निरया दिन बहु झालों ।
षडिपु जाचिती मातें म्हणौनि भ्यालों ।
म्हणे गोविंद तुझें रूप पाहुनि धालों ॥तार०॥३॥
पद २६६ वें.
ब्रम्हांडविलासा रामा ! । सुखधामा योगिविलासा ! ॥ध्रुवपद.॥
विश्वांतरसाक्षी तुजला साष्टांग नमन हें माझें ।
नि:संगा निर्विकारा, साकार स्वरूप तूझें ।
चैतन्या आत्मारामा, अवतरलाई सुरकाजें ।
चाल ॥ तुजला नराकृति साजे ।
चैतन्यस्वरूप विराजे ।
योगीजन ध्याती असे जे ॥ब्रम्हांड०॥१॥
त्रिभुवनकंटक दशमुख हा विधी वरदें उन्मद झाला ।
सुरपद हरिलें दुष्टाने, दिन केला विष्टपमेळा ।
रजनीचरमय क्षिति झाली पिडिलें नृप साधुजनाला ॥
चाल ॥ ब्राम्हा तुज शरण रिघाल ।
घेउनि देवांच्या पाळाला ।
प्रार्थियलें तुज कृपाळा ॥ब्रम्हांड०॥२॥
ऐकुनियां करुणा त्याची दशरथगृहीं अवतरलासी ।
मारुनि घट क्षात्रप्रतापें सुख दिधलें त्रैलोक्यासी ।
गोविंद शरण तुज आला दासाचा अभिमानी होसी ॥
चाल ॥ रामा तूं अखिलविलासी ।
देशिकराया ! सुखविलासी ।
दावीं चैतन्यरूपासी ॥ब्रम्हांड०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP