ज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १० वें.
लटकीच खटपट रे ! प्राण्या ! ॥ध्रुवपद.॥
मृगजळडोहीं लोटीयेलें तारुं । पाणीच ना तेथें कैंचा उतारू ॥लट०॥१॥
वांझेच्या पुत्रा मांडिला विवाह । पुत्रचिना तेथें कैंचा उत्साह ॥लट०॥२॥
स्वप्नीचें धन कालांतरिं घेईं । धनचि ना तेथें कैंचि सवाई ? ॥लट०॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐक गे ! मुक्तई । ओलचि ना तेथें पेरावें तें काई ? ॥लट०॥४॥
पद ११ वें.
काय नवल केलें कर्त्यानें ॥ चालती शहर ॥धुवपद.॥
काय साडेतीन हातांचा फेर । चौदा बुरुज न्यारे न्यारे ।
वावन झळती कंगुरे । तुटती तारे ॥काय०॥१॥
कचेरी भरली महाकारणी । आत्माराम बैसले येउनी ।
उन्मनी महालांत बैसली राणी । दिसे परिवार ॥काय०॥२॥
साठ तिनशें सखया तिशीं । बहात्तर कोटी राबतील दासी ।
रिद्धि सिद्धि पायांपाशीं । उभ्या समोर ॥काय०॥३॥
चंद्र सूर्य पवन पाणी । ब्रम्हा विष्णु शंकर धनी ।
ज्ञानदेव म्हणे त्रिभुवनीं । दिसे हें शहर ॥काय०॥४॥
पद १२ चें.
पद गातों मी नेणता । शोढुनी पाहें ज्ञानवंता ॥ध्रुवपद.॥
एक बाळ पुरुष उगवला । पश्चिम दिशेकडे गेला ।
तो कोठोनी हो ! आला ? ॥पद०॥१॥
पाळणा से टांगला । सांखळदंड नाहीं त्याला ।
त्यामध्ये सगुण बाळ घातला ॥पद०॥२॥
आकाशामध्यें नार जन्मली । बापलेकांनीं भोगिली ।
पांचांनीं ती वर्णिली ॥पद०॥३॥
ज्ञानदेव सांगे खूण । निवृत्तीच्य कृपेंकरून ।
ज्ञानेश्वराला ॥पद०॥४॥
पद १३ वें.
अलक्ष अगोचर गोसांवी । अलक्ष झला सहजची ।
अलक्ष झालीसे दीप्ती निरंजनाची ॥ध्रुवपद.॥
अलक्ष निरंजनाचा प्रकाश । शिव तृतीयेचा अंश ।
शिवापासोनी चैतन्यु । चैतन्याचा ॥अलक्ष०॥१॥
त्या चिअतन्याचे उदरीं । पुरुष जन्मला निर्धारीं ।
त्या पुरुषापासून सुंदरी । मूलमाया ॥अलक्ष०॥२॥
त्या मूळमायेच्या पोटीं । ओंकार जन्मल शेवटीं ॥
लोंकारापासून जगजेठी । महारुद्र तो ॥अलक्ष०॥३॥
त्या महारुद्राच्या तेजीं । विष्णु जन्मला सहजीं ॥
त्या विष्णुकमळामाजी । जाण विधाता ॥अलक्ष०॥४॥
त्या विधात्यापासून । पिंड ब्रम्हांड जाण ॥
ज्ञानदेवा सांगितली खूण । निवृत्तिरायें ॥अलक्ष०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP