पहिला, तिसरा, पांचवा, सातवा, नववा व अकरावा या दिवशीं जें श्राद्ध तें नवश्राद्ध होय. आश्वलायन शाखी नवश्राद्धें ५ सांगतात, अपस्तंभ शाखी ६ म्हणतात व इतर शाखीयांस विकल्पच सांगतात. ५ या पक्षीं ११ व्या दिवशीं नवश्राद्ध करुं नये. या नवश्राद्धासच विषम श्राद्धें असें म्हणतात. नवश्राद्धें १० दिवसांचे आंत करावी, व नवमिश्रश्राद्ध वर्षाती करावें, असे दुसरीकडे सांगितलें आहे. नवश्राद्ध केलें नाही तर प्रेतत्वापासून मुक्त होत नाहीं. नवश्राद्ध त्रयपक्षिक, षाण्मासिक व मासिकें ही श्राद्धें जो पुत्र करीत नाही त्याचे पितर अधोयोनीस जातात. अर्व्यविरहित, धूपरहित, गंधपुष्पवर्जित, अमंत्नक व पाद्यरहित असेम नवश्राद्ध जाणावें. आशिर्वाद, द्विगुणधर्म, जप, आशिर्वादस्वस्तिवाचन, पितृशब्द, स्वसंबंध, शर्मशब्द, पात्रालंभ, अवगाह, उल्मुक, उल्लेखनादिक, तृप्तिप्रश्न, विकिर, शेषप्रश्न, प्रदक्षिणा, विसर्जन, व सीमेपर्यंत जाणें हे अठरा पदार्थ प्रेतश्राद्धांत वर्ज करावें. ' तिलोसि ' या मंत्रांत स्वधाशब्द, व पितृशब्द याचा उच्चार करुं नये. प्रेतशब्दाच्या ऊहानें किंवा अमंत्रक तिल टाकावे. अर्घ्यदान अमंत्रक करावें. ' अमुष्मै स्वाहा ' या मंत्रानें प्रेताच्या नांवानें पाणिहोम करावा. ऋग्वेदांत सर्व एकोद्दिष्ट श्राद्धांत अग्नौकरण आहेच. इतर शाखीयांस याविषयीं निषेध आहे. त्रिनयन मंत्रांत म्हणजे उदक देण्याचे मंत्रांत ऊह करावा. अनुमंत्रणादिक अमंत्रक करावें. ' अभिरम्यतां ' या मंत्रानें विसर्जन करावें, असें नवश्राद्ध वर्ज्य करुन एकोद्दिष्ट श्राद्धाचे ठायीं जाणावे. नवश्राद्ध सर्व अमंत्रक करावें, असें नारायणवृत्तींत आहे. शहाण्या मनुष्यानें एकोद्दिष्ट श्राद्धांत पात्र उताणें मांडावें. पण पार्वणश्राद्धीं पात्र उपडें मांडून त्यावर कुश ठेवावे. सपिंडीकरणापर्यत प्रेतश्राद्धें लौकिकाग्नीवर करावीं, असें आश्वलायनाचें मत आहे. शक्य असल्यास नवश्राद्धें अन्नानें करावीं. अशक्य असल्यास आमान्नानें करावीं.
विघ्न असल्यास नवश्राद्ध मासिक व जें जें अंतरित श्राद्ध असेल तें तें पुढच्या श्राद्धासह एकतंत्रानें करावें. मृताशौचांत अन्याशौच प्राप्त झाल्यास नवश्राद्धें करावींच. सहगमन असल्यास सर्व नवश्राद्धें करावीं व सपिंडीकरण निरनिराळें करावें. वृषोत्सर्ग एकच करावा. स्त्रीच्या वृषोत्सर्ग ठिकाणीं १ गाय द्यावी. शूद्राचें सर्व कर्म अमंत्रक नाममंत्रानेंच द्विजासारखें करावें, असें स्मृत्यर्थ सारग्रंथांत म्हटलें आहे. या स्थलीं वयानें अधिक असा मृत झाल्यास मृताच्या कनिष्ठ सपिंडानीं १० व्या दिवशीं मुंडण करावें, असें कांही ग्रंथकार म्हणतात. मातापिता व आचार्य हे मरण पावले असतां नियमानें १० व्या दिवशीं मुंडण करावें. याप्रमाणें भर्ता मृत असतांही नियमानें स्त्रियेनेंही मुंडण करावें. सर्व पुत्रांनी व दहनकर्त्यानें पहिल्या दिवशी व १० व्या दिवशीं दहनांगभूत मुंडण करावें. याविषयी देशाचाराप्रमाणें व्यवस्था करावी. रात्रीं मृत झालेल्याचें दहन रात्रीं केलें तरी दुसर्या दिवशी प्रातःकालींच मुंडण करावें, असें म्हटलें आहे.
नंतर १० व्या दिवशी पूर्ववस्त्रशुद्धि व गृहशुद्धि करुन पांढरे शिरस व तीळ यांच्या कलकानें डोकीवरुन स्नान करावें, व नवीं वस्त्रें परिधान करुन पूर्वी धारण केलेलीं वस्त्रें व प्रेताचीं वस्त्रें अंत्यजास व आश्रितांस देऊन सुवर्णादिक मंगलवस्तूंस स्पर्श करुन गृहांत प्रवेश करावा.