संन्यासी मरण पावल्यास अशौच नाही. कारण त्याची प्रेतक्रिया, उदकदान, अशौच व सपिंडीकरणादिक यांचा निषेध आहे. ११ व्या दिवशीं सपिंडीच्या स्थानीं पार्वण श्राद्ध मात्र करावें. प्रतिसांवत्सरिक श्राद्ध, दर्शश्राद्ध, इत्यादिक तर पार्वणविधीनें सपिंडक होतेंच. याचा विस्तार ग्रंथांतरीं सांगण्यांत येईल. हा निर्णय त्रिदंडी संन्यासी, एकदंडी, हंस, परमहंस, इत्यादिक सर्वाविषयीं जाणावा. याप्रमाणे वानप्रस्थ मरण पावला असतांहीं अशौच नाही. जिवंत असतं ज्यानें आपली श्राद्धें केली तो मरण पावल्यावर सपिंडांनीं अशौच, इत्यादि धरावें किंवा धरुं नये, असा विकल्प आहे. ब्रह्मचारी मरण पावल्यास अशौच आहेच. युद्धांत मरण पावल्यास अशौच नाहीं, असें सर्व ग्रंथांत आढळतें. पण ब्राह्मणांत असा शिष्टाचार नाहीं. याप्रमाणें पांच प्रकारचा अशौचाचा अपवाद सांगितला.