त्यात दर्श, युगादि, मन्वादि, अष्टका, इत्यादि श्राद्धे पाक करणारा दुसरा असेल तर अन्नाने त्या दिवशीच करावी. पाक करणारा नसल्यास आमान्नादि द्रव्याने करावे. दर्शश्राद्ध ५ व्या दिवशी करावे, असा दुसरा पक्ष कालादर्श ग्रंथात सांगितला आहे. सकृन्महालय तर स्त्री रजस्वला असता मुख्य कालाचे उल्लंघन होते या भितीस्तव त्याच दिवशी करावा. आश्विन शु० ५ पर्यंतच्या कालाविषयी असाच निर्णय जाणावा. स्त्री रजस्वला असल्यास अष्टमी इत्यादि तिथीस सकृन्महालय करू नये. कारण, त्यास दुसरा काल आहे; इत्यादि महालयप्रकरणात सांगितलेला निर्णय जाणावा. प्रतिसांवत्सरिक व मासिक ही श्राद्धे स्त्री रजस्वला असताही त्याच दिवशी करावी, असा एक पक्ष आहे; व पाचव्या दिवशी करावी असा दुसरा पक्ष आहे. दोनही पक्षास ग्रंथसंमती व शिष्टाचारसंमती आहे. दुसरी स्त्री असल्यास त्या दिवशीच करावे हे सर्वसंमत आहे. त्या दिवशी करण्याचा पक्ष असेल तर श्राद्धकाली रजस्वला दर्शनादिक वर्ज्य करावे, यावर्न रजस्वलादर्शन होणार नाही, असे ग्रह नसेल व यथायोग्य पाक करणारा नसेल तर ५ व्या दिवशी श्राद्ध करावे हा पक्ष उत्तम. अपुत्र स्त्री रजस्वला असल्यास तिने भर्त्याचे वार्षिकादि श्राद्ध पाचव्या दिवशी करावे. दुसर्याकडून त्या दिवशी करवू नये.