ब्राह्मणांची पूजा केल्यावर, अग्नौकरणानंतर, भोजनोत्तर, विकिर दिल्यावर, स्वधावाचनानंतर किंवा ब्राह्मणाचे विसर्जन केल्यानंतर, असे सहा पक्ष स्मृतीत सांगितले आहेत. त्यांची व्यवस्था शाखापरत्वे जाणावी, असे निर्णयसिंधूत सांगितले आहे. त्यात आश्वलायनांनी ब्राह्मण जेवले असता आचमनाच्या पूर्वी किंवा आचमनानंतर पिंडदान करून विकिर द्यावा. आपस्तंब, हिरण्येकशीय, इत्यादिकांनी ब्राह्मणांचे विसर्जन केल्यावर पिंडदान करावे. कत्यायनांनी विकिर दिल्यावर आचमन करून किंवा आचमनापूर्वी त्यामध्ये ऋग्वेदीयांनी अग्नीत अग्नौकरण केले असता अग्नीच्या सन्निध व पाणिहोम असेल तर ब्राह्मणांच्या सन्निध पिंडदान करावे. अन्यशाखीयांनी बहुधा ब्राह्मणाच्या सन्निधच करावे. ब्राह्मणांच्या उच्छिष्टापासुन उत्तरेकडे चार हात किवा अरत्निप्रमाण प्रदेशी पिंडदानाचा संकल्प करून ऋग्वेदीयांनी एका हाताने, अन्यशाखीयांनी दोन हातांनी धरलेला जो खैराच्या काष्ठाचा स्फिय (खङ्ग) त्याने किंवा दर्भमूलाने 'अपहता असुरा०' हा मंत्र प्रत्येक रेषेच्या वेळी म्हणून आग्नेयीस अग्रे व पश्चिमेस समाप्ती होईल म्हणजे पश्चिमसंस्थ अशा जितकी पार्वणे असतील तितक्या म्हणजे एक, दोन अथवा तीन इत्यादि रेषा काढून प्रत्येक रेषेस उदक सिंचन करावे. पिंडसंकल्प व रेखाकरण याविषयि सव्य व अपसव्य यांचा विकल्प आहे. या स्थली कात्यायनांनी 'येरूपाणि' या मंत्राने अग्नौकरणाग्नीचे कोलित रेषेच्या दक्षिणभागी ठेवावे. रेखांवर एक वेळ छिन्न केलेला बर्हि (दर्भमुष्टि) दक्षिण दिशेस अग्रे होतील असा पसरून 'शुंधंता पितरः शुंधंता पितामहः' इत्यादि मंत्रांनी तिलोदक त्या दर्भबर्हिवर सिंचन करावे. या स्थली कात्यायनास 'पितरमुकनाम गोत्रावने निक्ष्व' इत्यादि मंत्र आहेत. इतर शाखीयांस 'मार्जयंता पितरः सोम्यासः' इत्यादि मंत्र आहेत.