वार्षिकादिक श्राद्धदिवशी श्राद्धानंतर त्याच पाकाने किंवा दुसर्या पाकाने नित्यश्राद्ध करावे. नित्यश्राद्धीय सर्व देवतांच्या पहिल्या श्राद्धी प्रवेश झाल्यास प्रसंगसिद्धिच होते. तसेच दर्शादिक श्राद्धे, महालय,अन्वष्टका, इत्यादि श्राद्धांचे ठायी नित्य श्राद्धाचा लोप करावा. हे नित्यश्रार्द्ध देवहीन व दर्शासारखे सहा देवतांनी युक्त दोन किंवा एक ब्राह्मण निमंत्रित करून देशकाल, अन्न, यांच्या नियमाने रहित पुनर्भोजन, ब्रह्मचर्य, इत्यादिक जे कर्त्याचे, भोक्त्याचे नियम त्याशिवाय जशा तशाच अनिषिद्ध अन्नाने दिवसास किंवा रात्रौ प्रहरपर्यंत करावे. स्वतः असमर्थ असेल तर पुत्रादिकांकडून करवावे. सुतक (अशौच) असता दर्शासारखा लोप करावा. वृद्धिश्राद्धानंतर मंडपादवासनापर्यंत सपिंडांनी करू नये. नित्य वैश्वदेवातील पितृयज्ञ झाल्यावर व मनुष्ययज्ञाच्या पूर्वीच करावे असे वाटते. नित्यश्राद्धाचे ठायी दर्शाप्रमाणे सहा पितरांचा देवरहित उच्चार करून 'नित्य श्राद्धं करिष्ये' असा संकल्प करावा. कर्ता शिष्यादिक असेल तर 'यजमानस्य पितृपितामह' इत्यादि उच्चार करून संकल्प करावा 'पितृणांइदमासनं' असे म्हणून आसन, 'नित्यश्राद्धे क्षणःक्रियतां' असा क्षण; व 'पूर्वोच्चरितः पितरः अयंवो गंधः' याप्रमाणे गंधादि उपचारांनी ब्राह्मणांची पूजा करून वर्तुल किंवा चतुःष्कोन मंडल करावे व त्यावर पात्र मांडून पात्रावर अन्न वाढून 'पृथिवीते पात्रं' इत्यादिकांपासून ब्रह्मार्पणापर्यंत कर्मे दर्शाप्रमाणे करावी. भोजनांती दक्षिणा देऊन किंवा न देऊन नमस्कार करून विसर्जन करावे.
ब्राह्मणाचा किंवा अन्नाचा अभाव असल्यास यथाशक्ति अन्न घेऊन त्या अन्नाचे सहा भाग करावे व 'अस्मत्पितृपितामह' इत्यादि चतुर्थ्य विभक्त्यंत सहा देवतांचा उच्चार्करून 'इदमन्नं स्वधानमम' असे म्हणून अन्नत्याग करावा. नंतर ते अन्न ब्राह्मण किंवा गाई यांस द्यावे, किंवा उदकादिकात टाकावे. अन्नत्यागाचाही लोप झाल्यास 'आर्चन्नत्र मरुत' या ऋचेचा दहा वेळा जप करावा. याप्रमाणे नित्यश्राद्धाचा विधि सांगितला.