निमंत्रण केल्यावर ब्राह्मणांस जननाशौच किंवा मृताशौच प्राप्त झाल्यास अशौच नाही. निमंत्रण शब्दाने दुसरा समंत्रक क्षण देतात तो घ्यावा. लौकिक निमंत्रण असा अर्थ घेऊ नये, असे वाटते. कर्त्यास पाकक्रियेनंतर म्हणजे मंत्राने पाक प्रोक्षण झाल्यानंतर अशौच नाही. कर्त्याचे घरी भोजनास प्रारंभ झाल्यावर जनन किंवा मरण झाले तर पात्रावरील शेष अन्न टाकून दुसर्याचा जलाने आचमन करावे. मला तर असे वाटते की, अशौचाचा अपवाद अनन्यगति विषयक असल्याने संकट नसल्यास पाक प्रोक्षण झाले असले तरी कर्त्यास अशौच प्राप्त झाल्यास त्याची निवृत्ति झाल्यावर श्राद्ध करावे. भोजन करणार्या ब्राह्मणास भोजनास आरंभ होण्यापूर्वी अशौचाचे ज्ञान झाल्यास दुसरा ब्राह्मण बोलवावा. भोजनास आरंभ झाल्यावर अशौच प्राप्त होईल तर कर्त्याने तसेच श्राद्ध समाप्त करावे. भोक्त्याने भोजनांती अशौचप्रकरणी सांगण्यात येणारे प्रायःश्चित्त करावे. संकट असेल तर पुर्वी सांगितलेले योग्य वाटल्यास ते घ्यावे.
आता निर्णयसिंधूत पाक प्रोक्षणानंतर अशौच नाही असे जे वचन आहे ते कर्तृपर असल्याने भोक्त्यास प्रायःश्चित्त व अशौच सांगितले आहे ते असे- अशौची श्राद्धात ब्राह्मणाने एकदा स्वेच्छेने भोजन केल्यास सांतपन कृच्छ्र प्रायःश्चित्त सांगितले आहे. अभ्यास असल्यास मासपर्यंत कृच्छ्र प्रायःश्चित्त करावे. ज्यास अशौच समजले आहे अशा ब्राह्मणादिकांचे अन्न नकळत भक्षण केल्यास ब्राह्मणान्नाच्या भोजनी एक दिवस; क्षत्रियान्नाच्या भोजनी ३ दिवस; वैश्यान्नाच्या भोजनी ५ दिवस; व शूद्रान्नाच्या भोजनी ७ दिवस उपवास करून अंती पंचगव्य प्राशन करावे. अभ्यास असल्यास द्विगुण प्रायःश्चित्त करावे. अशौचतर ब्राह्मणादिकांचे अशौचात एकवार जो अन्नभक्षण करितो त्याने अशौचीयांस जितके अशौच असेल तितके अशौच धरून अंती प्रायःश्चित्त करावे, असे विष्णूने सांगितलेले जाणावे. श्राद्धकाली व इतर काली हे सारखे आहे असे जाणावे. दाता व भोक्ता या उभयतास अशौच समजले नसल्यास दोष नाही. अशौचात श्राद्धदिवस प्राप्त झाल्यास अशौच निवृत्ति झाल्यावर ११व्या दिवशी ते श्राद्ध करावे. ११ वा दिवस मलमासात आल्यास मलमासातही करावे. ११ व्या दिवसाचे उल्लंघन झाले तर शुद्ध मासात करावे व हा निर्णय मासिक प्रतिसांवत्सरिक श्राद्धाविषयी जाणावा. दर्शादि श्राद्धांचा तर पंचमहादि यज्ञाप्रमाणे लोपच करावा. अशौचांती करू नये, व लोकप्रायःश्चित्तही करू नये. दर्शादिश्राद्धाचा लोप अशौचाशिवाय उपवासादि रुप प्रायःश्चित्त करावेच. इतर काली दर्शादि श्राद्ध करू नये. ११ व्या दिवशी असंभव असेल तर अमावास्या किंवा शुक्ल अथवा कृष्ण एकादशी या दिवशी वार्षिक श्राद्ध करावे. मासिक श्राद्ध, उदकुंभ श्राद्ध जे जे अंतरित असेल ते ते पुढच्या तंत्रासह करावे, असे सांगतात. अंतरित वार्षिक श्राद्धही दर्शादिकालाचा असंभव असल्यास पुढील मासात त्या त्या तिथीस करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात. अशौचाव्यतिरिक्त इत्यादि विघ्न व विस्मरण झाल्यास असाच निर्णय जाणावा. व्याधि, इत्यादि विघ्न प्राप्त झाल्यास पुत्रादिकाने त्या दिवशीच अन्नाने वार्षिक श्राद्ध करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात.