अग्नौकरणाचे शेषासहित सर्व अन्नात मध, घृत, तिल हे मिश्रित करून त्या अन्नाचे पिंड स्त्रीकडून करवून ते रेखेवर पराचीन म्हणजे उतरत्या हाताने पितृतीर्थाने पिता इत्यादिकांस द्यावे. त्याचा मंत्र
'एतत्तेस्मत् पितर्यथानामगोत्ररूप येचत्वामत्रानु पित्रे अमुक नामगोत्र रूपायायं पिंडः स्वधानमस्तेभ्यश्च गयायां श्रीरुद्रपदेदत्तमस्तु'
इत्यादि मंत्राने ऊहाने द्यावे.या पिंडदानी कित्येकास पिंडपात्र प्रक्षालन करणे व पात्र उपडे करणे ही सांगितली आहेत. कित्येक पिंडाविषयी माषान्न वर्ज्य करितात. नंतर जे लेपभाग असतील त्यांच्या तृप्तीसाठी हस्तलेप पिंडाच्या दर्भाचे मूलांचे ठायी पुसून
'अत्रपितरो मादयध्वं यथाभाग मावृषायध्वं' असा मंत्र म्हणून पिंडाचे एकवार अनुमंत्रण करून उजव्या पार्श्व भागाने उत्तरेकडे वळावे; व यथाशक्ति प्राणांचा रोध करून पुनः फिरून 'अमीमदंत पितर' हा मंत्र म्हणून तसेच अनुमंत्रण करावे व सव्याने पिंडशेष हुंगावे. नंतर आचमन करुन दुसरी पवित्रके धारण करून अपसव्याने 'शुंधता' इत्यादि जसे सूत्र असेल तसे उदक सिंचन पूर्वीप्रमाणे करावे. या पिंडदानाविषयी ब्राह्मणांनी भोजन केल्यावर जर अन्नशेष नसेल तर दुसर्या द्रव्याने पिंडदान करावे. कवठ, बेलफळ, कुक्कुटांड, आवळा व बोर यापैकी यथाशक्तीने कोणत्या तरी एका प्रमाणाचे पिंड करावे. त्रयीच्या तीन पिंडाविषयी पहिल्यापेक्षा दुसरा मोठा, असे उत्तरोत्तर अधिक प्रमाण सांगतात. हस्तलेपाचा अभाव असल्यास दर्भाचे ठायी हस्त पुसावाच असे मधोतिथी सांगतो. एकोद्दिष्ट श्राद्धाचे ठायी हस्तलेप नाही असे सुमंतु म्हणतो. येथे निवीचा विसर्मस करून अभ्यंजनादिक करवे असे काही ग्रंथकार म्हणतात. पिंडाची पूजा केल्यावर व उपस्थानाच्यापूर्वी नीवीविसर्मस करावा, असे श्राद्धसागरात आहे.
यावर "अस्मत् पितरममुकनामगोत्र रूपाभ्यंक्ष्व" याप्रमाणे जसे लिंग असेल त्याप्रमाणे मंत्रावृत्तीने पिंडाचे ठायी तैल अथवा घृत अभ्यंजन दर्भांनी देऊन व 'अक्ष्व' असे म्हणून काजळ द्यावे. आपस्तंबांनी पूर्वी अंजन व नंतर अभ्यंजन द्यावे. 'एतद्वः पितरोवासो' हा मंत्र प्रतिपंडास पठण करून वस्त्र अथवा वस्त्राची दशा किंवा त्रिगुण सूत्र प्रत्येक पिंडास द्यावे, असे हेमाद्रीत म्हटले आहे. एक वेळ मंत्र म्हणून एकच वेळ द्यावे, असे काही ग्रंथकार म्हणतात. कात्यायनांनी तर प्रत्येक पिंडास नामगोत्रादिकांचा उच्चार करून मंत्राने त्रिगुण सूत्र द्यावे. नंतर गादी, उशी हे पदार्थ निवेदन करून 'अस्मत पितृभ्यः' अशा चथुर्थी विभक्तीने अक्षता, गंध, पुष्प, धूप, दीप सर्व प्रकारचा नैवेद्य, तांबूल व दक्षिणा, इत्यादि उपचारांनी पिंडाची पूजा सव्याने किंवा अपसव्याने करावी. भक्ष्य, भोज्य असे शुद्ध अन्न जे सिद्ध केले असेल ते पिंडाचे मूळी निवेदन केल्याशिवाय कधीही भक्षण करू नये. नंतर 'नमोवः पितर इषे' इत्यादि मंत्राने पिंडांची प्रर्थना करून उताण्या हाताने 'परेतनः' हा मंत्र एकदा म्हणून एकदम पिंड लोटावे.
नंतर दक्षिणाग्नीत होम असा पक्ष असेल तर 'अग्नेतमद्याश्व' हा मंत्र म्हणून अग्नीच्या संनिध यावे व 'यदंतरिक्षं' या मंत्राने गार्हपत्याग्नीचे उपस्थान करावे. गृह्याग्नीत होम असा पक्ष असेल तर गार्हपत्यपदरहित मंत्र म्हणून उपस्थान करावे. हे उपस्थान ऋग्वेदीयांसच आहे. पाणिहोम असेल तर ऋग्वेदीयांसही उपस्थान नाहीच. 'वीरंमेदत्तपितरः' या मंत्राने मध्यपिंड एक किंवा दोन व अन्वष्टक्यादि श्राद्धात मधले तीन पिंड घेऊन पत्नीस द्यावेत. नंतर पत्नीने 'आदत्तपितरः' या एकदा म्हटलेल्या मंत्राने एक किंवा अनेक पिंड प्राशन करावे. आपस्तंब तर 'अपांत्वौषधीनां रसंप्राशयामि भूतकृतं गर्भदत्स्व' या मंत्राने मध्यम पिंड पत्नीस द्यावा असे सांगतो. प्राशनाविषयी मंत्र तोच पण 'यतेहपुरुषोअसत' असा निराळा पाठ मात्र होतो. याप्रमाणेच कात्यायनांचा निर्णय जाणावा. प्रजाकामत्व म्हणजे संततीची इच्छा असताच स्त्रियेस हे पिंड प्राशन करण्यास सांगितले आहे. कित्येकांच्या मते ते नित्य आहे. भार्या अनेक असतील तर पिंड विभागून प्रत्येक स्त्रियेने मंत्राने प्राशन करावा. दोन भार्या असतील तर दोन पिंड दोन स्त्रियांस द्यावे. बहुत स्त्रिया असतील तर गुणांनी व वयाने योग्य असेल तिलाच पिंड द्यावा. बहुत योग्य असतील तर एका दर्शाचे ठायी एकीस व दुसर्या दर्शाचे ठायी दुसरीस याप्रमाणे द्यावा. पत्नी रोगीट, देशांतरी राहणारी, गर्भिणी किंवा बाळंतीण असेल तर वृद्ध बैल किंवा बोकड याजकडून तो पिंड भक्षण करवावा. इतर दोन पिंड उदकात टाकावे. पुत्रादिकांची इच्छा नसेल तर अग्नी किंवा जल यात पिंड टाकावेत. अथवा गायी, बोकड किंवा कावळे यास द्यावे. तीर्थी श्राद्ध असता सर्वकाल पिंड तीर्थात टाकावे.