ब्राह्मणादिकांचा अभाव असेल तर दर्भबटु विधीने पिंडदान मात्र करावे, असे सांगितले; अथवा श्राद्धपदार्थ व ब्राह्मण यांचा अभाव असल्यास पक्वानाचा पितृसूक्ताने होम करावा. किंवा श्राद्धदिवस प्राप्त झाला असता पुरुषाने उपोषित रहावे. अथवा अशक्त असल्यास ब्राह्मणास उदकुंभ इत्यादि अल्प दान करावे. किंवा गाईस तृण घालावे. किंवा पिंडप्रदान करावे. अथवा तिल व दर्भ यांनी स्नानपूर्वक पितरांचे तर्पण करावे. अथवा तिलाचा भारा दहन करावा. अथवा धान्य किंवा तिल किंवा अल्प दक्षिणा द्यावी. अथवा संकल्पापासून सर्व श्राद्धप्रयोग पठण करावा. सर्वांचाच अभाव असेल तर अरण्यात जाहून बाहू वर करून व स्वतःच्या काखा दाखवून
'नमेस्तिवित्तंनधनंनचान्यच्छ्राद्धेपियोगी स्वपितृन्नतोस्मितृप्यंतुभक्त्या पितरो मयैतो भुजौकृतौ वर्त्मनिमारुतस्य'
हा श्लोक पठण करावा. प्रभास खंडात दुसरेही मंत्र सांगितले आहेत. याप्रमाणे अनुकल्प सांगितले.