त्यांत ब्राह्मणाचें प्रेत नगराचे पश्चिम द्वारानें, शूद्राचें दक्षिण द्वारानें बाहेर काढून सजातीयांनीं मुख आच्छादिलेलें व पूर्व दिशेस मस्तक केलेलें असें शव दहन करण्याचे स्थळीं न्यावें. पूर्वी सांगितलेला अग्नि शवाचे पुढें दुसर्यानें न्यावा. प्रेत व अग्नि यांचे मधून दुसर्यानें जाऊं नये. सर्व सपिंडक इत्यादिक अधोभागीं उपवीति केलेले, मुक्त केश असें असून त्यांनी ज्येष्ठांच्या मागून प्रेताचें अमुगमन करावें. नग्न प्रेत दहन करुं नये. निःशेषेंकरुनही दहन करुं नये. शवाचें वस्त्र स्मशानांत राहणार्यास द्यावें. प्रेताचे केश नख इत्यादिकाचें वपन करुन स्नान घालवून गंधपुष्पें इत्यादिकांनीं अलकृत करुन तें दहन करावें. दिवसा मृत झाल्यास दिवसासच दहन करावें; रात्रीं मृत झाल्यास रात्रींच दहन करावें. दिवसा अथवा रात्रीं प्रेत दहन करण्याचें राहिल्यास तें पर्युषित ह्नणजे शिळें होतें. पर्युषित झालेल्या प्रेतास पंचगव्यानें स्नान घालून ३ प्राजापत्यें करुन दहन करावें. मुखावरील सात ( मुख, २ नासिकाछिद्रें, २ नेत्र व २ कर्ण ) छिद्रें हिरण्याची शकलें घालून आच्छादित करावीं. यास्थलीं पात्र, स्थापन व समंत्रक दहनादि विधि हे आपापल्या सूत्राप्रमाणें श्रौत व स्मार्त अंत्येष्टि प्रयोगांत पहावे. नंतर दहन झाल्यावर घट फोडणें इत्यादिक करावें. अश्माचा विपर्यास झाला तरी घट फोडणें याची आवृत्ति करुं नये. नंतर सर्वानीं अप्रदक्षिण असें चितेच्या सभोंवार फिरुन सवस्त्र स्नान करुन आचमन करावें व सगोत्र, सपिंड, समानोदक, मातामही, मातामह, आचार्यादिक, कन्या, भगिनी, यांस अवश्य तिलांजलि द्यावा. तो असाः -- वृद्धपूर्वक दक्षिणाभिमुख होऊन '' अमुक गोत्र - नामा प्रेतस्तृप्यतु '' या मंत्रानें अंजलीनें १ वेळ अश्म्यावर उदक द्यावें. येथें स्नानोदक देणें असेल तर '' अपनः शोशुचदघं. '' या मंत्रानें द्यावें. स्नानच या मंत्रानें करावें, असें कांही म्हणतात. स्त्रियांनी उदक देण्याविषयीं मंत्र नाही. मातुल, आत, मावशी, भगिनीपुत्र, श्वशुर, मित्र, उपाध्याय, इत्यादिकांस उदकदान कृताकृत आहे. करण पक्ष असतंही अश्म्यावरच द्यावें असा नियम नाहीं. व्रात्य, ब्रह्मचारी, पतित, व्रती, षंढ व चोर यांनीं तिलांजली देऊं नये. यथाकालीं उपनयन न झालेले ते व्रात्य होत. प्रायश्चित्तात आरंभ केलेले ते व्रती होत. सुवर्ण व तत्सम द्रव्यांचा अपहार करणारे ते चोर होत. ब्रह्मचार्यांनी माता, पिता, पितामह, मातामह, गुरु व आचार्य इत्यादिकांस उदकदान करावें. ज्यांनी प्रायश्चित्तास आरंभ केला आहे त्यांनी प्रायश्चित्ताची समाप्ती झाल्यानंतर तिलांजलि देऊन त्रिरात्र अशौच धरावें. व्रात्य इत्यादिकांनी प्रेतास स्पर्श, वहन, दहन व पिंडादिक ही करुं नयेत. दुसरा अधिकारी नसल्यास ब्रह्मचार्यानें पिता इत्यादिकानें दहन करुन अशौच धरावें, पण त्यास कर्म लोप नाही, असें सांगितलें आहे. हें उदक देणें तें एकवस्त्र होऊन अपसव्यानेंच द्यावें. उदकदान केल्यावर पुनः स्नान करुन वस्त्रें पिळून कुलांतील वृद्धांनी पूर्वीचे इतिहास सांगून पुत्रादिकांचें समाधान करावें. ब्राह्मणांच्या अनुमतीनें कनिष्ठानुक्रमानें घरीं जाऊन कडुनिंबाचीं पानें हळूहळू भक्षण करुन आचमन करुन अग्नि, उदक, गोमय इत्यादिकांस स्पर्श केल्यावर द्वारसंबंधी अश्म्यावर ( पायरीवर ) पाय देऊन घरांत प्रवेश करावा. निंबाचीं पानें भक्षण करावीं किंवा करुं नये; नंतर त्या दिवशीं उपोषण करावें. उपोषण करण्यास असामर्थ्य असल्यास याचनेवांचून प्राप्त झालेलें किंवा दुसर्याच्या घरीं शिजलेलें असें एकच हविष्यान्न भक्षण करुन राहावें.
अशौचांत माष, मांस, अपूप, मधुर, लवण, दूध, अभ्यंग, तांबूल व क्षार हे पदार्थ वर्ज करावेत. तिल व मूग, यांशिवाय शेंगेत उत्पन्न होणारें धान्य, सस्यांतील गहूं व कोद्रव हीं धान्यें आणि धन, देवधान्य, शमी धान्य, ( मूग, उडीद, राजमाष, कुळीथ, हरभरे, तिल, वाटाणा व तूर ) स्विन्नधान्य, पण्य व मुळा हे क्षार पदार्थ जाणावेत. सैंधव भक्षण करावें, असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. आरसा, स्त्रीसंग, द्यूतादिक, हंसणें, रडणें, उंचासन हीं नित्य वर्ज करावींत. बाल, वृद्ध व रोगी वर्ज करुन तृणाच्या हंव्या पसरलेल्या भूमीवर निरनिराळी निद्रा करावी. कांबळें इत्यादिक अंथरलेल्या भूमीवर निद्रा करुं नये. मार्जनादिक न करितां स्नान करावें. अस्थिसंचयन झाल्यावर भार्या, पुत्र, यांहून इतरांस आंथरुण, आसन इत्यादि भोग आहेत; पण स्त्रीसंग करुं नये.