विवाह, उपनयन, चौल ही झाली असता क्रमांनी १ वर्ष, सहा महिने व तीन महिने आणि इतर संस्कार व केवळ वृद्धि श्राद्ध ही असता एकमासपर्यंत पिंडदान, मृत्तिकास्नान व तिलतर्पण ही करू नयेत. श्राद्धांगतर्पण व नित्य तर्पण ही तिलांनी करू नये असा अर्थ आहे. मंगलकर्य केलेल्यांनी महालय, गयाश्राद्ध, मातापितरांचे प्रतिसांवत्सिक श्राद्ध, कोणीही मृत झाल्यास त्याची सपिंडी व षोडश मासिकात प्रेतकृत्ये यांचे ठायी पिंडदान करावे. भ्राताइत्यादिकांचे वार्षिक श्राद्धी पिंडदान करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात. पिंडयज्ञ, यज्ञ व सपिंडी यात पिंड द्यावेच. त्याचप्रमाणे विकृतिरूप अन्वष्टका इत्यादिकात जेथे पुनः पिंडदानविधि सांगितला किंवा जेथे पूर्वेद्युः श्राद्धादिकात पिंड पितृयज्ञास विकृतित्व सांगितले तेथेही पिंडदानाचा निषेध नाही असे निर्णयसिंधूत आहे. यावरून अष्टकाश्राद्धीही पिंडदानाचा निषेध नाही असे वाटते. मंगल केल्यावर पिंडदानतिलतर्पण यांचा निषेध सांगितला आहे, तो त्रिपुरुष सपिंडांसच आहे असे वाटते.