वाहनांचा त्याग करून मनुष्यांनी पादचारी व्हावे व भक्तीने जमिनीवर लोळावे, व कार्पटिक (तीर्थाटन करणाराचा) वेश धारण करावा. तीर्थप्राप्तीच्या पूर्वदिवशी किंवा त्याच दिवशी उपवास करावा. नंतर तीर्थत मुसलस्नान करून (अमंत्रकस्नान) उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख होऊन केश, स्मश्रू, लोम व नके यांचे उदकसंस्थ वपन करावे. यानंतर समंत्रक स्नान करावे. प्रणवमनाने उदक ढवळून तीर्थाचे आवाहन करावे व त्यात अवगाहन करून
'ॐनमोदेवदेवायशितिकन्ठायदण्डिने । रुद्रायचापहस्तायचक्रिणे वेधसेनमः सरस्वतीचसावित्रीवेदमातागरियसी । सन्निधात्रीभवत्वत्रतीर्तेपापप्रणाशिनी'
या मंत्राने स्नान करावे. शेषस्नानविधि नित्याप्रमाणे करावा. नंतर तर्पणांनी तीर्थश्राद्ध करावे. श्राद्धाचे दुसरे दिवशी तेथून प्रयाण करावे; श्राद्धदिवशी करू नये. कुरुक्षेत्र, विशाल, विरज व गया ही तीर्थे सोडून सर्व तीर्थी मुंडण व उपवास हा विधि आहे. सर्व तीर्थी या शब्दाने प्रसिद्ध महातीर्थी असा अर्थ घ्यावा. दहा मासानंतर पुनः तीर्थ प्राप्त झाल्यास मुंडण इत्यादि तीर्थविधि करावा. प्रयागास ३ योजनांपासून आलेल्याने १० महिन्यांच्या पूर्वीही करावा. जीवत्पितृक, गर्भिणी पत्नी, चौलसंस्कार झालेला बाळ व सौभाग्यवती स्त्रिया यासही प्रयागास वपन आहे. सौभाग्यवती स्त्रियांचे सर्व केश उपळून २ अंगुळे छेदावे, असे काही ग्रंथकार म्हणतात. प्रयागास वेणीदान करण्याचा विधि आहे तो दुसर्या परिच्छेदात सांगितला आहे. संन्याशांनी तीर्थाचे ठायीही ऋतूंचे संधिकाळीच कक्षोपस्थ वर्ज्य करून वपन करावे. तीर्थ प्राप्त झाल्यास त्वरेने स्नान, पितृतर्पण व श्राद्धादिक करावे. पर्वादिकालाचा विचार करू नये. अकस्मात महातीर्थ प्राप्त झाल्यास व २।३ इत्यादि दिवस राहणे अशक्य असल्यास भोजन केलेल्याने रात्री व अशौची यानेही ग्रहणपर्वासारखे स्नान व हिरण्यादिकाने तीर्थश्राद्ध करावे. मलमासाविषयीही अशीच योजना करावी.