ज्याच्या पिता इत्यादिकाचे ज्या मासात, ज्या पक्षात व ज्या तिथीस मरण झाला असेल तो त्याचा मृत दिवस होय. म्हणून त्या दिवशी पित्रादि तीन देवतांनी युक्त असे सांवत्सरिक श्राद्ध पुरुरवार्द्रव देवसहित करावे. सांवत्सरिक श्राद्धी पित्रादि त्रयीस सपत्नीकत्व नाही व येथे मातामहादि त्रयीही नाही. २ दिवस तिथि असता, श्राद्ध रात्रीही कर्तव्य असता, ग्रहण दिवस प्राप्त झाला असता, मलमासादिक असता, दर्शाचे दिवशी सांवत्सरिक श्राद्ध आले असता काय करावे याचा निर्णय व शुद्धिश्राद्धाचा निर्णय, श्राद्धकालाचा निर्णय प्रसंगाने पूर्वी सांगितला आहे तो जाणावा. 'पारणा व मरण याविषयी तत्काल व्यापिनी तिथी घ्यावी' असे वचन असल्याने मरणकालक तिथीच्या अपराह्ण काळव्याप्तीने आद्विकश्राद्धाचा निर्णय जाणावा. मातापितराचे प्रथमादिक श्राद्ध विभक्त बंधूंनी पृथक करावे. विभक्त नसल्यास ज्येष्ठानेच करावे. मातेच्या मृत दिवशी मात्रादि तीन देवतांनी युक्त श्राद्ध करावे. माता व पिता यांचा मृत दिवस एक असेल तर पूर्वी पित्याचे श्राद्ध करून स्नान केल्यावर मातेचे श्राद्ध करावे. याप्रमाणे एके दिवशी मातापितरास मरण आल्याने मातेचे दहन भर्त्यासहित केले असताही असाच निर्णय जाणावा. सहगमन केले असेल तर एकच पाक करून पिता व माता या दोन पार्वणांनी युक्त श्राद्ध करावे. पिंड व अर्घ्ये ६ करावी. विश्वेदेव निराळे करू नयेत. सहगमन केले असेल तर एकच पाक करून पिता व माता या दोन पार्वणांनी युक्त श्राद्ध करावे. पिंड व अर्घ्ये ६ करावी. विश्वेदेव निराळे करू नयेत. सहगमन व सुवासिनी मरण असता ब्राह्मणाच्या पंक्तीस एक सुवासिनी भोजनास सांगावी व तिला कुंकुमादिक स्त्रियेचे अलंकार द्यावे. सर्वच स्त्रियांचे श्राद्धांत ब्राह्मणास वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, इत्यादिक उपचार द्यावेत. कुंकुमादिक देऊ नये. याप्रमाणे सापत्न माता, मातामह, मातामहपत्नी, भ्राता, सासू, सासरा, गुरु, आत, मावशी, भार्या, भर्ता, भगिनी, इत्यादिकांस पुत्र नसतील तर पार्वण विधीनेच प्रतिवार्षिक श्राद्ध करावे. कित्येक ग्रंथकारांचे असे म्हणणे आहे की, पिता, माता, मातमह व मातामही, याशिवाय इतर सर्वांचे एकोद्दिष्टविधीने श्राद्ध करावे. यासंबंधी व्यवस्था देशाचारानुरूप जाणावे. पिता, इत्यादिकांच्या वार्षिक श्राद्धदिवशी पितृव्यादिकांचे वार्षिक श्राद्ध येईल तर पुत्राने स्वतः पिता, इत्यादिकांचे श्राद्ध करावे. पितृव्य इत्यादिकांचे श्राद्ध पुत्र, शिष्य, इत्यादिकांकडून करवावे किंवा स्वतः दुसर्या दिवशी करावे. सन्याशाचे आद्विकादि श्राद्ध पार्वणासहित पुत्राने करावे. पहिल्यावर्षांती सपिंडी करण्याचा पक्ष असेल तर मृत दिवसाच्या पूर्वदिवशी सपिंडी व अद्वमूर्ती श्राद्ध करून दुसर्या दिवशी वार्षिक श्राद्ध करावे.