जीवत्पितृनिर्णय प्रसंगी व श्राद्धाधिकारी निर्णयप्रसंगी बहुतेक सांगितलेच, आहे त्याहून विशेष मात्र येथे सांगतो- धन विभागून घेतलेल्या भ्रात्यादिकांचे सर्व धर्म निराळेच होत. सपिंडीपर्यंत प्रेतकर्म, षोडश मासिके हे एकासच आहे. इत्यादि पूर्वी सांगितलेच आहे. द्रव्याची अपेक्षा ज्यास नाही अशी शान, संध्या, ब्रह्मयज्ञ, मंत्र, जप, उपवास, पारायण, इत्यादि नित्यनैमित्तिक व काम्य कर्मे अविभक्तांनी निराळीच करावीत, अग्निसाध्य असे श्रौत व स्मार्त नित्यकर्मही निराळेच करावे. पितृपाकाने व भ्रातृपाकाने उपजीविका करणारा इत्यादिक दुसरा पक्ष सांगितला तो कात्यायनादिपर होय. पंचमहायज्ञात देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ व मनुष्ययज्ञ हे ज्येष्ठासच होत. पाक निराळा असेल तर आश्वलायन शाखीयांस पृथक् वैश्वदेव विकल्पाने सांगितला आहे. ज्येष्ठाने वैश्वदेव केला असता कनिष्ठाचा पाक सिद्ध असेल तर कनिष्ठाने मुकाट्याने अल्प अन्न अग्नीत टाकून ब्राह्मणास अन्न देऊन भोजन करावे, असे कोणी म्हणतात. देवपूजा निराळी किंवा एकत्र करावी. अविभक्त भ्राते एकाच काली तीर्थास प्राप्त झाल्यास तीर्थश्राद्धादिक एकानेच करावे. पृथक् प्राप्त झाल्यास पृथक पृथक करावे. गयाश्राद्धाविषयीही अशीच योजना करावी. द्रव्याने साध्य असे दानहोमादि काम्य कर्म करण्याचा भ्राता इत्यादिकांचा अनुमतीने कनिष्ठास अधिकार आहे. मघायुक्त त्रयोदशी श्राद्ध निराळेच करावे, असे सांगितले आहे.