देशांतरी सपिंडाचे मरण १० दिवसांनंतर समजल्यास दीड महिनापर्यंत त्रिरात्र, सहामासपर्यंत पक्षिनी, नऊ मासपर्यंत १ दिवस व वर्षपर्यंत सज्जाति असे माधवाचे मत आहे. देशांतरी सपिंडाचे मरण १० दिवसांनंतर समजल्यास स्नानमात्र करावे असे विज्ञानेश्वर म्हणतो. या बाबतीत माधवाचे मतच योग्य आहे. अतिक्रांत अशौच व वयोवस्थानि मित्तक अशौच ही सर्ववर्ण साधारण आहेत. ब्राह्मणास वीस योजनांपलीकडे व क्षत्रियादिकांस क्रमाने २४-३०-६० योजने याने देशांतर जाणावे. ३० योजनांपलीकडे ब्राह्मणास देशांतर आहे असे काही ग्रंथकार म्हणतात. भाषा निराळी असली व मोठा पर्वत किंवा भाषा निराळी असून मध्ये नदी असेल तर तेही देशांतरच होय. भाषा निराळी नसली तरी पर्वत, नदी हे मध्ये असतील तर ते देशांत होय असे जे म्हणतात ते योजनाच्या वीस इत्यादि संख्येत ३।४ योजने कमी असली तरी देशांतर संपूर्ण होईल; अशा संपाद्कत्वाने योजावे, असे वाटते. असे न योजल्यास महानदीच्या पलीकडच्या तीरी व अलीकडच्या तीरी जे राहणारे त्यास एका योजनामध्येही देशांतर घडेल. येथे सगोत्रविषयक अशौचे मात्र भार्या, पती, पुत्र इत्यादि सर्वांनी धरावी. मातुलत्व, भगिनीत्व इत्यादि प्रयुक्त निरनिराळ्या गोत्रातिल अशौचे भार्या, पती व पुत्र इत्यादिकांपैकी जे ज्याचे संबंधी असेल त्यानेच अशौच धरावे, सर्वांनी धरू नये.
रात्रौ जनन व मरण झाले किंवा रात्रौ मरणाचे ज्ञान झाले तर रात्रीचे तीन भाग करून पहिले २ भाग असता पूर्व दिवस, व तिसरा भाग असता पुढचा दिवस धरून त्या दिवसापासून अशौच धरावे. किंवा अर्धरात्रीपूर्वी पूर्व दिवस नंतर पुढला दिवस धरावा. याविषयीही देशाचार इत्यादिकांवरून व्यवस्था जाणावी.
आहिताग्नीचा समंत्रक दहन झाल्या दिवसापासून पुत्रादिकांनी अशौच धरावे. येथे आहिताग्नि या पदाने तीन श्रोताग्नींनी युक्त असा अर्थ ग्रहण करावा. त्याहून निराळा गृह्याग्निमान तोही अनाहिताग्नि विदेशी मरण पावल्यास समंत्रक दाहापूर्वी पुत्रादिकांस अशौच व संध्यादि नित्यकर्मलोप नाही. समंत्रक दहनाचे आरंभापासून पुत्रादिक सपिंड व कन्या, दौहित्र इत्यादि भिन्नगोत्रीयांस अशौच आहे. अतिक्रांत निमित्तक अशौचाचा अभाव व त्या अशौचाचा र्हास म्हणजे न्यून करू नये म्हणूनच आहिताग्नींचा पर्णशर (पालाशविधि) दाह झाला असला तरी देशांतर व कालांतर असताही १० दिवस अशौच असे सिद्ध होते. अनाहिताग्नीचे मरणदिवसापासून आरंभ करून पुत्रादिकांनी अशौच धरावे. अनाहिताग्नि देशांतरी मरण पावल्यास, मरण ऐकल्यानंतरच पूर्वी सांगितल्याप्रमाणे अतिक्रांताशौच धरावे. अनाहिताग्नीचा अस्थिदाह किंवा पर्णशरदाह असल्यास पूर्वी अशौच न धरलेले, भार्या व पुत्र यांनी १० दिवस अशौच धरावे. भार्यापुत्रांनी पूर्वीच अशौच न धरलेले असेल तर संस्कार कर्त्याशिवाय जी स्त्रीपुत्र त्यांनी दहनकाली त्रिरात्र अशौच धरावे. सवतीचेही परस्पर याप्रमाणे अशौच जाणावे. स्त्रियेच्या संस्कारी पतीसही याप्रमाणे जाणावे. याहून निराळे असलेल्या सपिंडांनी पूर्वी अशौच धरले नसले तर अनाहिताग्नीच्या संस्कारकाली त्रिरात्र अशौच धरावे. ज्या सपिंडांनी अशौच धरले असेल त्यांनी दहनकाली स्नान मात्र करावे. सपिंडास हे त्रिरात्रादिक व पुत्रादिकास १० दिवस इत्यादिक सांगितलेले अशौच १० दिवसांनंतर संस्कार करणे असेल तरच जाणावे. १० दिवसात संस्कार केला तर शेश दिवसांनीच शुद्धि व कर्मसमाप्ति होते. आहिताग्नीचाच १० दिवसातही शरीरदाह, अस्थिदाह किंवा पालाशविधिदाह केला तरीही शेष दिवसांनी शुद्धि होत नाही. कारण आहिताग्नीचा समंत्रक दाह ज्या दिवशी होतो तोच त्याचा पहिला दिवस असे सांगितले आहे. देशांतरी मरण पावलेला जो अनाहिताग्नि त्याच्या मरणाची वार्ता दहा दिवसांनतर समजल्याने श्रवण दिवसापासून तीन दिवस अशौच सपिंडांनी धरले असून चौथ्या दिवशी क्रियेस आरंभ असेल तर सपिंडांनी दहनकाली स्नान मात्र करावे. अशौच न धरलेल्या सपिंडांनी ३ दिवसच अशौच धरावे. भार्यापुत्रादिकांनी श्रवणदिवसापासून १० दिवस अशौच धरावे. दुसरा इत्यादि दिवशी संस्कारास आरंभ झाल्यास सपिंडांची शुद्धि चौथ्या दिवशी होते. भार्यादिकांची शुद्धि श्रवणदिवसापासून १० दिवसांनीच होते असे जाणावे. देशांतरी गेलेल्याची १२ वर्षे वाट पाहून पालाशविधीने दाह केला असता असाच निर्णय जाणावा. पुत्रादिक व सपिंड यास क्रमाने दशरात्रत्रिरात्र इत्यादिक जाणावे. ज्या दिवसापासून वार्ता श्रुत झाली नाही त्या दिवसापासून १५ वर्षे मातापितरांची वाट पहावी. इतरांची पूर्व वय असता २० वर्षे, मध्यम वय असता १५ वर्षे, उत्तर वय असता १२ वर्षे व मरणनिश्चयाचा असंभव असता युक्ति इत्यादिकेकरून प्रतीक्षा करावी.