प्रत्यक्ष शवसंस्कार असतां दिनशुद्धीचा विचार करुं नये. अशौचांत करणें असेल तर दिनशुद्धीचा विचार करावा. १० दिवसांनंतर तर दिनशुद्धी पाहूनच दिवस घ्यावा. त्यांत वर्षानंतर प्रेतकर्म करावयाचें असल्यास उत्तरायण श्रेष्ठ होय. त्यांतही कृष्ण पक्षच घ्यावा, व त्यांत नंदा ( प्रतीपदा, षष्ठी, एकादशी ) त्रयोदशी, चतुर्दशी व दिनक्षय हे वर्ज्य करावे. शुक्र व शनि हे वार वर्ज्य होत. कित्येकांच्या मतें भौमवारही वर्ज्य आहे. नक्षत्रांपैकीं भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठाचें उत्तरार्ध, व शततारकादि ४ नक्षत्रें व त्रिपुष्कर योग अशीं अत्यंत अतिदुष्ट ही सर्वथा वर्ज्य करावीं. कृत्तिका, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा, पूर्वाभाद्रपदा, हीं त्रिपाद नक्षत्रें, द्वितीया, सप्तमी व द्वादशी या तिथी; आणि मंगळ, शनि व रवि या तिघांचा योग असतां त्रिपुष्कर योग होय. कित्येकांनीं रविस्थानीं गुरुवार सांगितला आहे. ह्याच तिथी व वार असून मृग, चित्रा व धनिष्ठा यांचा योग आल्यास द्विपुष्कर योग होतो. वृद्धि, लाभ, नष्ट, चोरी व मरण यांच्या ठायीं त्रिपुष्कर योग असल्यास तो त्रिगुण फल देतो. व द्विपुष्कर योग द्विगुण फल देतो. म्हणून प्रेतकार्य करितांना हे दोनही वर्ज्य करावेत. दोहोंचा योग असतां द्विपुष्कर होतो, असें कोणी ग्रंथकार म्हणती. गुरुशुक्रांचे अस्त, पौषमास, मलमास, वैधृति, व्यतिपात, परिघयोग, भद्राकरण, चौथा, आठवा व बारावा चंद्र हीं सर्व वर्ज्य करावीं. रोहिणी, मृग, पुनर्वसु, पूर्वा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा व धनिष्ठा हीं नक्षत्रें किंचित् दुष्ट आहेत म्हणून शक्य असल्यास ती टाकावी. मंगळवारही टाकावा, असें कांहींजण म्हणतात. कर्त्याच्या ३ जन्मतारा म्हणजे जन्मनक्षत्र, जन्मनक्षत्रापासून १० वें व १९ वें नक्षत्र यांचे ठायीं व प्रत्यरितारा यांचे ठायीं पर्णशरादि दहन इष्ट नाही.
त्याचप्रमाणें रवि, गुरु व सोम हे वार आणि अश्विनी, पुण्य, हस्त, स्वाति व श्रवण हीं नक्षत्रें प्रशस्त होत. मध्यम व सर्वथा त्याज्य हीं सांगितलींच आहेत. नंदा तिथी, शुक्रवार, चतुर्दशी, तीनजन्मतारा व प्रत्यरितारा, यांचे ठायीं एकोद्दिष्ट श्राद्ध अत्यंत निंद्य होय. प्रत्यक्ष ११ व्या दिवशीं कोणताही दोष नाही.