रोगी, निरोगी अशा सर्व वर्णास प्रयाग क्षेत्रीं भागीरथींत प्रवेश ( जलसमाधि ), इत्यादि केल्यानें मरण प्राप्त झाल्यास इच्छित फल मिळतें. शूद्र रोगी नसला तरी त्यास प्रयागावांचून अन्य उदकादिकांतही मरण विहित आहे. व्याधिष्ट, वैद्यानें टाकिकेला, असा ब्राह्मण वृद्ध असो वा तरुण असो, तो जल, अग्नि इत्यादि साधनांनी देह विसर्जन करील त्यास यथेष्ट फल मिळेल. चिकित्सा करण्यास अशक्य अशा महारोगांनीं पीडलेला व म्हणून वांचण्यास असमर्थ झालेल्या मनुष्यानें प्रदीप्त अग्नींत प्रवेश करावा; तसेंच उपोषणही करावें. खोल उदकाच्या डोहांत प्रवेश करावा किंवा उंच कड्यावरुन उडी टाकावी. उत्तरयात्रा करावी किंवा आदरानें हिमालयास जावें. प्रयाग क्षेत्रीं वटवृक्षाचे शाखांवरुन जो भागीरथींत देहत्याग करितो तो आत्मघाती होत नाहीं व त्यास उत्तम लोक प्राप्त होतात. याप्रमाणें देहत्याग करणारे सर्व वर्णातील पुरुष व स्त्रिया व विजेनें मलेले यांचें ३ दिवस अशौच धरावें. असाध्य झाल्यामुळें औषधोपचार बंद केले असतां जान्हवीचे उदकांत मध्यभागी राहून किंवा काष्ठ, पाषाण यांत असतां जो वाराणशी क्षेत्रांत मरण पावतो व काशीस जाण्याविषयीं उन्मुख असल्यास त्याचे कर्णमूलस्थ विश्वेश्वर होऊन तारक प्रणवाचा उपदेश करतो, इत्यादि पुराणांतील वाक्यें माधवादिकांचे ग्रंथांत सांगितलीं आहेत. येथें शास्त्रानें अनुज्ञात जी बुद्धिपूर्वक आत्महत्या तिजविषयी गृहस्थादिकांसच अधिकार आहे. सन्याशादिकांस अधिकार नाहीं. कारण ३ दिवस इत्यादि अशौचाचें विधान केलें आहे; व सन्याशास काम्यकर्माचा अधिकार नाही, असें निर्णयसिंधूंत म्हटलें आहे.