त्यांत देशांतरीं मरण पावला असतां दोन पराक किंवा ८ कृच्छ्र प्रायश्चित्त करुन अस्थींचें दहन करावें. चांडाळ, कुत्रा, इत्यादिकांचा स्पर्श अस्थींस झाला असेल तर पंचगव्य, उदक इत्यादिकांनीं त्या प्रक्षालन करुन दहन करावे. ज्याच्या अस्थि मुळींच मिळत नाहींत त्याचें पर्णशर विधीनें दहन करावें. ३६० कुशांनीं किंवा ३६० पळसाच्या समिधांनी प्रेत करावें. याप्रमाणें संख्या सांगितली आहे. भूमीवर कृष्णाजिन पसरुन त्या कृष्णाजिनावर एक शरसंज्ञक तृण दक्षिणायत ठेवून त्यावर पळसाचीं वृत्तें स्थापावीत. ती अशीः-- मस्तकावर ४०, मानेवर १०, प्रत्येक बाहूवर ५० एकूण शंभर; हाताचे बोटांवर १०, वक्षःस्थळावर २०, जठरावर ३०, शिश्नावर ४, अंडावर ३।३ मिळून ६, प्रत्येक मांडीवर ५० मिळून शंभर, जंघेपासून पायांचे तळव्यापर्यंत प्रत्येकास १५, एकूण ३०, पायाचे बोटांवर १०; याप्रमाणें ३६० दर्भानी किंवा पळसाच्या समिधांनी शरीर करुन तें लोंकरीच्या वस्त्रानें बांधून त्यास उदकमिश्र पीठ लिंपावे. शक्ति असल्यास नारळ इत्यादिकही घालावे. तें असें:-- मस्तकाचे ठिकाणी नारळ किंवा वाटोळा भोपळा; ललाटाचे ठिकाणी केळीचें पान; दांतांचे ठिकाणीं डाळिंबाच्या बिया, कानांचे ठिकाणी कंकण किंवा ब्रह्मपत्र, नेत्रांचे ठिकाणीं २ कवड्या; नासिकास्थानी तिलपुष्प, नाभिस्थानी कमल, स्तनांचे ठिकाणीं २ जांभळें, वातस्थानीं मनशीळ, पित्तस्थानीं हरताळ, कफस्थानीं समुद्रफेन, रुधिरस्थानीं मध, पुरीषस्थानी गोमय, मूत्रस्थानीं गोमूत्र, रेतस्थानीं पारा, वृषणस्थानीं २ वांगीं, शिश्र्नस्थानीं गाजर, केशस्थानी वनडुकराचे केश, अथवा वडाच्या पारंब्या, लोमस्थानीं लोकर; व मांसस्थानीं उडदाचे पिठाचा लेप करुन पंचगव्य व पंचामृत यांनीं सर्वत्र सिंचन करावें. नंतर ' पुनर्नोअसुं० असुनीते० ' या दोन ऋचा म्हणून प्राणाचा प्रवेश झाला अशी भावना करावी. अथवा ' यत्तेयमं ०' या सूक्तानें व ' शुक्रमसि०' या मंत्रानें पारा घालून ' अक्षीभ्यां०' या मंत्रानें शरीरास स्पर्श करावा. यानंतर शरीरास स्नान घालून चंदनाचा लेप करावा, व वस्त्र आणि यज्ञोपवीत परिधान करवून ' अयंसदेवदत्तः ' असें म्हणून स्पर्श करावा. ' इदंचास्योपासनं ०' असें म्हणून ध्यान करावें व यधाविधि दहनादिक करावें. या स्थळीं आहिताग्नीचा अस्थिदाह किंवा पर्णशर दाह असतां १० दिवस अशौच व अनाहिताग्नीचें ३ दिवस अशौच, इत्यादि पूर्वोक्त निर्णय जाणावा. बारा वर्षे इत्यादि कालपर्यंत वाट पाहिल्यावर पर्णशरदाह इत्यादि कर्म करणें असेल तर ३० कृच्छ्रें व ३ चांद्रायणें करुन करावें.