आता होमाचा प्रकार सांगतो - ऋग्वेदी यांचा व्यतिषंगपक्ष असेल तर 'अग्नौकरणंकरिष्ये' असा प्रश्न करून 'क्रियताम्' अशी आज्ञा मिळाल्यावर गृह्याग्नीवर पक्व झालेला चरु घेऊन त्याचे दोन भाग करावेत. अपसव्याने उत्तर भागातून अवदान धर्माने चरु प्रेक्षणावर घेऊन 'सोमाय पितृमते स्वधानमः सोमाय पितृमत इंदनमम' याप्रमाणे होम करून दक्षिण भगातून पुनः तसेच अवदान घेऊन 'अग्नयेकव्यवाहनाय स्वधानमः' असे म्हणून होम व त्याग करावा. सव्याने किंवा अपसव्याने प्रेक्षण अग्नीत टाकावे. अथवा सव्याने स्वाहान्त उक्त मंत्राने दोन आहुति सोम व अग्नि यांच्या व्यत्यासाने घेऊन होम करावा. कात्यायनांनी जर गृह्याग्नीवर चरु शिजविल्यावाचून पंचाग्नीवर शिजलेला चरु घेऊन त्यावर घृत घालावे; व पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रश्न व आज्ञा झाल्यावर स्मार्ताग्नीस परिस्तरणे घालून तीन समिधा हवन करून सव्याने '
अग्नये कव्य वाहनायस्वाहा, सोमाय पितृमते स्वाहा'
असे म्हणून प्रेक्षणाने दोन आहुति हवन कराव्या; किंवा अपसव्याने हवन कराव्या. पाणिहोमाविषयीही असाच प्रकार जाणावा. इतर विशेष पूर्वी सांगितलाच आहे. अपस्तंबांचा तर आज्यभागानंतर 'उध्रियतां अग्नौच क्रियतां' असा प्रश्न झाल्यावर 'काममुप्रियतां' अशी अनुज्ञा जाणावी. हिरण्यकेशी यांचा
'उद्धरिष्याम्यग्नौ करिष्यामि' असा प्रश्न व 'यन्मेमाता०'
इत्यादि मंत्रांनी सात चरूच्या आहुति व सहा आज्याच्या आहुति अशा तेरा आहुति जाणाव्या. विस्तारभयास्तव मंत्र सांगितले नाहीत. हिरण्यकेशीयांच्या आज्यभागानंतर 'सोमाय पितृमते' इत्यादि सोळा मंत्रांनी सोळा आज्याहुति व सोळा अन्नाहुति अशा प्रत्येक पार्वणाविषयी जाणाव्या. मंत्रात पित्रादि पदांचा उह आणि आज्य व अन्न या पदांचा ऊह करणे तो त्या ग्रंथात पहावा. अतिविस्तारभयास्तव येथे सांगत नाही.