तीर्थ, तिथिविशेष, गयाश्राद्ध व प्रेतपक्ष (अपरपक्ष) असता निषिद्ध दिवस असला तरी तिलतर्पण करावे. तिथिविशेष म्हणजे अष्टकादि तिथि असे मयूखात आहे. याविषयी वार्षिकादि श्राद्धी दुसर्या दिवशी व भरणी, इत्यादि श्राद्धी विसर्जनानंतर श्राद्धांगतर्पण करण्याचा आचार कात्यायनांचा आढळत नाही. त्याविषयी मूळ शोधून पाहावे. क्षयाह श्राद्ध दिवशी नित्य तर्पणात तिलग्रहण करणे फार ग्रंथविरुद्ध आहे.
नांदीश्राद्धाविषयी जे सांगावयाचे त्याचा विस्तार पूर्वार्धात केला आहे. उपनयनादि मोठी कार्ये कर्तव्य असता पूर्वदिवशी नांदीश्राद्ध करावे. जातकर्मादि अल्प कार्ये असता त्या दिवशीच करावे. देशकालांचा उच्चार करून
'सत्यवसुसंज्ञका विश्वेदेवा नान्दीमुखाः मातृपितामही प्रपितामह्यो नान्दीमुख्यः पितृपितामह प्रपितामहा नान्दीमु० मातामह मातु० पत्नीसहितानान्दी० एतानुद्दिश्यपार्वणविधानेत सपिण्ड नान्दीश्राद्धं करिष्ये'
असा संकल्प करावा. अर्घ्यकाली ९ च पात्रे स्थापून त्यावर २।२ कुश ठेवावे व 'यवोसिसोम दैवत्य' यापूर्वी सांगितलेल्या उहाने त्या पात्रात यव टाकून 'उशंतस्वा०' या मंत्राने आवाहन करावे, व
'अमुकविश्वेदेवाः प्रीयन्ता नान्दीमुखा मातरः प्रीयन्ता नान्दीमुखाः पितामह्यः प्रीयन्ता'
इत्यादि वाक्यांनी जसे लिंग असेल त्याप्रमाणे पुढे मांडावी. नंतर 'नांदीमुखामातरइदंवोर्घ्य' इत्यादि वाक्याने जसे लिंग असेल त्याप्रमाणे दोघांस अर्घ्यपात्र विभागून द्यावे. २।२ वेळ गंध द्यावे. चतुर्थी विभक्त्यंत उद्देशाने 'स्वाहा हव्यंनमम' इत्यादि प्रकाराने देवाप्रमाने अन्नदान करावे. पिंडदान काली
'नान्दीमुखाभ्योमातृभ्यःस्वाहानान्दीमुखाभ्यःपितामहीभ्यःस्वाहा'
असे प्रत्येकास २।२ पिंड याप्रमाणे १८ पिंड द्यावेत. येथे अनुमंत्र कृताकृत आहे. या रीतीने सर्व पित्र्यकर्मही सव्यादिकाने व दैवधर्माने करावे, इत्यादि सर्व प्रकार पूर्वार्धातील जाणावा. पूर्वार्धात न सांगितलेला विशेष प्रकार मात्र येथे सांगितला आहे.