ब्राह्मणास सहगमनच विहित आहे. क्षत्रियादिकांस सहगमन व अनुगमन विहित होय. एका चितेवर आरोहण करून दंपत्याचा बरोबरच समंत्रक दाहास सहगमन असे म्हणतात. भर्त्याचा समंत्रक दाह झाल्यावर निराळ्या चितेत अग्निप्रवेश करणे यास अनुगमन असे म्हणतात. त्यात दोहोचीही एक तिथी असेल तर एके दिवशीच एकतंत्राने पाक इत्यादि करून दर्शाप्रमाणे ६ पिंड, ६ अर्घ्य, पृथक पृथक ब्राह्मणांचे ठायी पितृपार्वण, मातृपार्वण यांनी विशिष्ट असे श्राद्ध करावे. विश्वेदेव भिन्न किंवा अभिन्न असावे, असा भेद आहे. तिथि निराळी असली तरी श्राद्धदिवस एकच असेल तर असाच निर्णय जाणावा. तिथि निराळी असल्यामुळे श्राद्धदिवस निराळा असेल तर वार्षिकादि श्राद्ध निराळेच करावे. सहगमनाची तिथि निराळी असली तरी भर्त्याच्या क्षयाह श्राद्ध दिवशी पत्नीचे श्राद्ध करावे, अन्य दिवशी करू नये, असे काही ग्रंथकारांचे म्हणणे आहे, ते कालाचे अंतर अल्प असल्यास योजावे. २-३ इत्यादि तिथींचे अंतर असल्यास योजू नये.