आतां घटस्फोट करुन बहिष्कृत केलेला, म्लेच्छ झालेला व प्रायश्चित्तास अयोग्य असलेला असे मातापित्याहून निराळे जे ३ प्रकारचे पापी त्यांचा पतितोदकविधि झाल्यावर सर्पिडीकरण वर्ज्य करुन अंत्यकर्म व पिता, माता आणि ३ प्रकारचे पापी यांचेंही नारायणबलिपूर्वक व सपिंडीकरणासहित सर्व अंत्यकर्म होतें, असें सांगितलें आहे. त्यांत पतितोदक दानाचा विधि असाः -- सर्वाप्रत गमन करणारी अशी दासी बोलावून आणून तिला वेतन देऊन अशुद्ध जलानें भरलेला घट हातांत घेतलेल्या दासीस असें म्हणावें कीं, हे दासी, जा उदकानें भरलेला घट व मोल्य देऊन तिल ही शीघ्र घेऊन ये. नंतर दक्षिणदिशेस सन्मुख बसून डाव्या पायानें तो घट तिलासहित ढकलून देवघट ढकलण्याच्या काली '' अमुक संज्ञक पतित प्रेत पिबपिब '' ( ' हे अमुक संज्ञ पतितप्रेता, प्राशन कर, प्राशन कर ' ) असा वारंवार उच्चार कर. नंतर त्या दासीनें तें वाक्य श्रवण करुन मोल्य घेऊन तसें करावें. असें केलें असतां पतिताची तृप्ति होते. नाहीं तर होत नाहीं. हा विधि पतिताचे मृत दिवशीं करावा. याप्रमाणें पतितोदकदानाचा विधि सांगितला. याप्रमाणें मृत दोषानें अशौचाचा अपवाद प्रसंगासह व सविस्तर निरुपण केला.