दहनादि दिवसात आरंभ करुन १० दिवसांत १० पिंड दर्भानीं आस्तीर्ण केलेल्या भूमीवर अमंत्रक द्यावे. क्षत्रियादिकांनीं ९ दिवसपर्यंत ९ पिंड द्यावे, १० वा पिंड अशौचाच्या शेवटच्या दिवशीं द्यावा. पहिल्या दिवशीं जें स्थल, जो कर्ता, जें तंदुलादि द्रव्य, जी उत्तरी, जो अश्मा, जें पाक करण्याचें पात्र, इत्यादि तींच दहा दिवसपर्यंत ग्रहण करावींत. यांतून एखाद्याचा विपर्यास झाल्यास ज्या दिवसापासून विपर्यास झाला त्या दिवसापासून पुनरावृत्ति करावी. अश्म्यांचा विपर्यास झाला तरी घट फोडणे इत्यादिकाची आवृत्ति करुं नये. असें सांगितलें आहे. म्हणून लौकिक अश्मा ग्रहण करावा. यावरुन पिंडदान, तिलांजली इत्यादि कर्माचीच आवृत्ति करावी. दहनाची करुं नये, असें होते. आचार्याचा ह्नणजे क्रिया सांगणाराच विपर्यास झाला तरी आवृत्ति करावी, असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. जेव्हां पुत्रादिक मुख्य कर्ता जवळ नसल्यानें अमुख अधिकार्यानें पिंडदान क्रिया आरंर्भिली असेल तेव्हां पुत्रादिकाचें मध्यंतरी सानिध्य झालें तरी अमुख्य कर्त्यानेच १० दिवसपर्यतची क्रिया समाप्त करावी. पण ११ व्या दिवसाची इत्यादि क्रिया पुत्रादिक मुख्यानेंच करावी. समंत्रक दहन मात्र दुसर्यानें केलें असल्यास पिंडदानादिक १० दिवसांची क्रिया समीपस्थ मुख्यानेंच करावी. असें मिताक्षरादिक ग्रंथ म्हणतात. सगोत्र किंवा असगोत्र जो समंत्रक दहन करणारा त्यानें १० दिवसपर्यंत क्रिया करावी; असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. क्रिया करणारी पत्नी असून ती रजस्वला झाल्यास रजोदर्शनशुद्धीनंतर तिनें क्रिया करावी. कर्त्यास अस्वास्थ्य असल्यास दुसर्यानें सर्व क्रिया पुनः कराव्या. पिंडाच्या द्रव्यांत तांदूळ हे मुख्य होत. तांदूळ नसल्यास फल, मूल, शाक किंवा तिलमिश्र असलेल्या यवांचें पीठही घ्यावे. प्रेतश्राद्धाचे ठायी पितृशब्द, स्वधाशब्द, अनुशब्द व पुष्प, धूप, दीपदान, इत्यादिकांविषयीं मंत्र ह्नणूं नये. तीन दिवसांचे अशौचांत पालाशविधीनें दहनादिक झालें असल्यास पहिल्या दिवशी १ पिंड, दुसर्या दिवशीं ४ पिंड व तिसर्या दिवशीं ५ पिंड असा क्रम जाणावा. पुत्रानें पालाशविधीनें दहन केलें असतां त्यास १० दिवस अशौच आहे. म्हणून ३ दिवसांत पिंडांची समाप्ती करुं नये. प्रथम पिंडानें प्रेतास सर्वकालशिर प्राप्त होतें; दुसर्या पिंडानें कर्ण, नेत्र व नासिक व तिसर्या पिंडानें कंठ, स्कंध, भुज व वक्षस्थळ, चौथ्या पिंडानें नाभिलिंग व गुद; पांचव्यानें गुडघे, मांड्या व पाय; सहाव्यानें मर्मस्थानें; ७ व्यानें नाड्या: ८ व्यानें दांत व लोम; ९ व्यानें वीर्य व १० व्या पिंडानें पूर्णपणा, तृप्तता व क्षुधेचा विपर्यास हीं होतात. मृण्मय पात्रांत उदक व दूध घालून १० दिवस आकाशांत म्हणजे अंतरालांत ठेवावें. ' प्रेतात्रस्नाही ' असें म्हणून उदक व ' इदंपिब ' असें म्हणून दूध ठेवावें. हें करावें किंवा न करावें. उदकानें भरुन ठेवावें, भोजनसभयीं भक्षण करण्याचे अन्नांतून भाताची मूठ घेऊन संबोधन विभक्तीनें नामगोत्राचा उच्चार करुन ती पित्रयज्ञाप्रमाणें भूमीवर द्यावी. भूलोकापासून प्रेतलोकापर्यंत जाण्यासाठी मृत मनुष्याचें जें श्राद्ध करावें तें पाथेय श्राद्ध होय.