माता, पिता, भार्या, सुह्रद व गुरु यातून ज्याच्या उद्देशाने जो तीर्थस्नान करील त्या मनुष्यास त्याचे अष्टमांश फळ मिळेल; अथवा ज्याचे उद्देशाने दर्भमयी प्रतिमा करुन त्या प्रतिमेस महातीर्थोदकी स्नान घालील त्यास अष्टमांश फळ मिळेल.
पक्वान्नाने तीर्थी श्राद्ध केल्यास त्याच अन्नाने पिंडप्रदान करावे. हिरण्यादिकाने श्राद्ध केल्यास पिंडप्रदानाची द्रव्ये पीठ, संयाव, पायस, पिण्याक व गूळ यापैकी कोणतेही घ्यावे. पिंड तीर्थातच टाकावे. दुसरा निर्णय नाही. हे तीर्थश्राद्ध अपुत्र विधवेने करावे. कारण पुत्रवतीने भर्त्याचे श्राद्ध कधीही करू नये अशी स्मृति आहे. हे श्राद्ध उपनयन न झालेल्यानेही करावे. पण संन्याशाने करू नये. संन्याशाने गयेस जाऊन श्राद्ध करू नये. त्याने दंडाचे प्रदर्शनच करावे. विष्णुपदी दंड स्पर्श केल्याने तो पितरांसह मुक्त होतो. याप्रमाणेच कूप, वर, इत्यादिकीही दंड प्रदर्शनच करावे. उपजीविकेच्या दुर्बलतेमुळे तीर्थी प्रतिग्रह केल्यास त्याच्या दशमांशाने शुद्धि होते.