ज्या श्राद्धात जितके पितर तृप्त झाले असतील तितक्या पितृगणांचे उद्देशाने त्या श्राद्धीगत्वाने तिलाने तर्पण करावे. त्याविषयी कालचा नियम-दर्शश्राद्ध असता पूर्वी व प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता दुसर्या दिवशी. त्याचे तात्पर्य हे आहे की, दर्शश्राद्धी श्राद्धाचे पूर्वी श्राद्धांग तिलतर्पण करावे. त्यातही ब्राह्मणास निमंत्रण केल्यावर किंवा पाकास आरंभ केल्यावर ब्रह्मयज्ञ कर्तव्य असल्यास ब्रह्मयज्ञांगभूत नित्य तर्पणानेच दर्शश्राद्धांगभूत तिलतर्पणाची सिद्धि होते. ब्राह्मणास निमंत्रण करण्यापूर्वी किंवा वैश्वदेवानंतर ब्रह्मयज्ञ कर्तव्य असेल तर श्राद्धसंबंधी ६ पुरुषांच्या उद्देशाने श्राद्धांगतर्पण करून श्राद्धास आरंभ करावा. प्रत्याहिक पितृतर्पण ब्रह्मयज्ञ काळीच करावे. याप्रमाणे युगादि, मन्वादि, संक्रांती, पौर्णमासी, वैधृति व व्यतिपात या श्राद्धात दर्शाप्रमाणे पुर्वीच करावे. तीर्थश्राद्धी सर्व पितरांच्या उद्देशाने पूर्वी करावे. वार्षिक श्राद्धाचे दिवशी नित्य तर्पण तिलाने करू नये. सकृन्महालयश्राद्धी सर्व पितरांच्या उद्देशाने दुसर्या दिवशीच तिलतर्पण करावे. इतर महालय, पक्ष, अष्टका, अन्वष्टका, पूर्वेद्युःश्राद्ध, माध्यावर्ष, अर्धोदय, गजच्छाया, षष्ठी, भरणी, मघा ही श्राद्धे व हिरण्यश्राद्ध यांचे ठायी श्राद्धीय देवतांचे उद्देशाने श्राद्धानंतर तत्कालीच तिलतर्पण करावे; श्राद्ध संपात असेल व त्या श्राद्धाची प्रसंगसिद्धि असेल तर तेच तर्पण करावे. तंत्र असेल तर पूर्वतर्पणयुक्त व पश्चातर्पणयुक्त अशा श्राद्धांची संख्या सारखी असेल, तर पूर्वी किंवा अंती तर्पण करावे. विषमसंख्या असेल तर ज्यांची संख्या अधिक असेल त्याप्रमाणे पूर्वी किंवा अंती करावे. संक्रांती, ग्रह, मातापितरांचे श्राद्ध, दर्शव्यतिपात, पितृव्यादिक श्राद्ध व महालय यांचे ठायी निषिद्ध दिवस असला तरी श्राद्धांग तिलतर्पण करावे, असे काही ग्रंथकार म्हणतात; व सर्वत्र श्राद्धांग तिलतर्पणाविषयी तिथि, इत्यादिकांचा कोणताही निषेध नाही, असे दुसरे ग्रंथकार म्हणतात.