जेव्हा भाचा इत्यादिक मातुलादिकांचे अंत्यकर्म करितो तेव्हा त्यास अंत्य कर्मसंबंधी १० दिवस, इत्यादि अशौच असता त्या अशौचात जर सपिंड मरणनिमित्तक १० दिवस इत्यादि अशौच प्राप्त झाले तर पुर्वीच्या अशौचाने त्याची शुद्धि होत नाही. कारण, कर्मांगभूत अशौच अस्पृश्यतेस मात्र कारण असल्याने संध्यदिक कर्माचा लोप नसल्याने ते लघु आहे. म्हणून लघु (अल्प) अशौचाने गुरु (मोठ्या) अशौशाची निवृत्ति होत नाही. याप्रमाणे त्रिरात्र अशौच असताही त्रिरात्र अशौच असताही त्रिरात्र जननाशौचाची निवृत्ति व त्रिरात्र मृताशौचाची निवृत्ति होत नाही, इत्यादिक जाणावे. सपिंडाच्या अशौचाने पुत्राचे मातापित्यासंबंधी अशौच निवृत्त होत नाही. याप्रमाणे स्त्रियेचे भर्त्यासंबंधी अशौचही दूर होत नाही. पतीचे स्त्रीसंबंधी अशौचही निवृत्त होत नाही, असे काही ग्रंथकार म्हणतात. मातेच्या अशौचात पित्याचे अशौच प्राप्त झाल्यास पूर्वीचे अशौच संपताच शुद्धि होते. पित्याचे अशौच संपूर्ण धरावे असे स्मृत्यर्थसारादि ग्रंथात म्हटले आहे. पित्याचे अशौचात माता मृत झाल्यास पित्याचे अशौच संपल्यावर मातेचे पक्षिणी अधिक अशौच धरावे. हे पक्षिणी अधिक अशौच धरणे ते दहाव्या रात्रीच्यापूर्वी मरण असता किंवा समजले असता धरावे. पण दहाव्या रात्री किंवा दहाव्या रात्रीच्या चौथ्या प्रहरी माता मृत झाल्यास किंवा मेल्याचे समजल्यास २।३ रात्री अधिक धरावे. पक्षिणी धरू नये. अनाहिताग्नि भर्त्याचे मरणापासून दुसर्या इत्यादि दिवशी मातेने सहगमन केले तर मातेचे अशौच अधिक पक्षिणी भर्त्याचे अशौचाअंती शुद्धि होते. नवश्राद्ध पिंडादिक एकदाच समाप्त नाही करावे. भर्त्याचे अशौचानंतर स्त्री सती गेल्यास त्रिरात्र अशौच धरावे. व हे त्रिरात्र अशौच सपिंडांनीच धरावे. पुत्रास तर मातेचे अशौच संपूर्ण आहेसे वाटते. सहगमन असता सपिंडासही पूर्णच अशौच आहे. त्रिरात्र अशौच अनुगमनपर आहे असे गौड म्हणतात. व हेच म्हणणे योग्य आहे. संपात असता पूर्वी शौचाने शुध्दि होते पण ती सूतिकेची व अग्नि देणाराची होत नाही. देशांतरी मृत झालेल्या पित्याची वार्ता ऐकून पुत्राने १० दिवस अशौच धरले व अस्थि न मिळाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे संस्कार तर केला नाही व १० दिवसांनंतर संस्कार आरंभिला तर संस्कार करणार्या पुत्रास कर्मांगभूत १० दिवसांचे अशौच आहे. या अशौचात सपिंड मृत झाल्यास पूर्वाशौचाचे अंती शुद्धि होत नाही. माता मृत असताही अधिक पक्षिणी अशौच नाही. तर सपिंडाशौच व मातेचे अशौच संपूर्णच धरावे; कारण, गतकालापेक्षा वर्तमानकाल बलवान आहे. याप्रमाणे १२ वर्षे इत्यादि वाट पाहिल्यावर पुत्रादिकांनी जो पित्रादिकांचा संस्कार करावयाचा त्याचे अंगभूत असलेल्या १० दिवसांच्या अशौचात अन्य सपिंडादिकांचे मरण असताही पूर्व शेषाने शुद्धीचा अपवाद निर्णयसिंधूत सांगितला आहे. जननाशौच किंवा मृताशौच यामध्ये मृताशौच प्राप्त झाल्यास पिंडदानादिक अंत्यकर्माचा प्रतिबंध नाही. मृताशौच किंवा जननाशौच यामध्ये पुत्रजनन झाल्यास जातकर्मादि करण्याविषयी प्रतिबंध नाही. असे काही ग्रंथकार म्हणतात. पूर्वीचे अशौचाअंती जातकर्म करावे असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. मातेचे जे अधिक पक्षिणी अशौच त्यातही पित्याचे महैकोद्दिष्ट श्राद्ध वृषोत्सर्ग, शय्यादान इत्यादि करावे. अन्य सपिंडाचे अशौचात ११ व्या दिवसांचे कृत्य करु नये. असे बहुत ग्रंथकार म्हणतात. कोणी एक ग्रंथकार करावे असे म्हणतो.